

मुंबई : मुंबई शहर व उपनगरात पडणाऱ्या वार्षिक पावसाचा अभ्यास करून, शहरात ठिकठिकाणी तुंबणारे पाणी कसे रोखता येईल, यासाठी मुंबई महापालिका अभ्यास गट तयार करणार आहे. यात आयआयटी मुंबई व व्हीजेटीआयच्या तज्ज्ञांचा समावेश असणार आहे.
मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबून जनजीवन विस्कळीत होते. पाणी तुंबू नये यासाठी आतापर्यंत १० हजार कोटी रुपये पेक्षा जास्त खर्च करण्यात आले. दरवर्षी नालेसफाईवर सुमारे १०० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. तरीही पाणी तुंबायचे तेवढे तुंबते. विशेषतः हिंदमाता, गांधी मार्केट सायन व अंधेरी, मिलन सबवे येथे हमखास पाणी तुंबते. त्यामुळे मुंबईत दरवर्षी सरासरी पडणारा पाऊस, पावसाळी पाणी वाहून नेण्यासाठी असलेली पर्जन्य जलवाहिनीची क्षमता, नाले, नदी, रस्त्यालगटची गटारे व पर्जन्य जलवाहिनी विभागातील अन्य यंत्रणेचा अभ्यास करण्यात येणार आहे.
अभ्यास करण्यासाठी आयआयटी मुंबई व व्हीजेटीआयच्या तज्ज्ञांचा समावेश असलेला एक अभ्यास गट तयार करण्यात येईल. अभ्यास गट माजी महानगरपालिका आयुक्त आणि पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे माजी मुख्य अभियंत्यांचे यांचे मत घेतील. अभ्यास गट मुंबईच्या भूप्रदेशरचनेचे आणि सरासरी वार्षिक पावसाचे विश्लेषण करून उपाययोजना सुचवेल, असे पर्जन्य जलवाहिनी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. अभ्यास गट नेमल्यानंतर सहा महिन्यात अभ्यास पूर्ण करून हा गट आपला अहवाल महापालिकेला सादर करेल. त्यानुसार महापालिका पुढील उपाय योजना हाती घेईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
तातडीने निचरा कसा करता येईल...
मुंबईत दरवर्षी सरासरी २५०० ते ३००० मिमी पाऊस होतो. अनेकदा यापेक्षाही जास्त पाऊस पडतो. त्यामुळे एवढ्या मिलिमीटर पावसाचे शहरात किती प्रमाणात पाणी साठू शकते, त्या पाण्याचा तातडीने निचरा कसा करता येईल. बशीसारखा असलेल्या भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणती यंत्रणा वापरता येईल, याचाही अभ्यासामध्ये समावेश राहणार आहे.