

मुंबई : जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत देशातल्या ७ महत्त्वाच्या शहरांमध्ये ३ लाख ९५ हजार ६२५ घरांची विक्री झाली. याची एकूण किंमत ६ लाख कोटी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांच्या विक्री मूल्यात ६ टक्क्यांनी वाढ झाली असली तरी गृहविक्रीत १४ टक्क्यांनी घट झाली आहे.
मुंबई महानगर प्रदेशात यावर्षी सर्वाधिक १ लाख २७ हजार ८७५ घरांची विक्री झाली. त्या खालोखाल पुण्यात ६५ हजार १३५ घरांची विक्री झाली. मात्र मुंबईत १८ टक्के आणि पुण्यात २० टक्के घट दिसून आली. यावर्षी देशभरात विक्री झालेल्या ३ लाख ९५ हजार ६२५ घरांपैकी मुंबई आणि पुण्यातील घरांचा वाटा ४९ टक्के आहे. २०२४ साली ७ शहरांमध्ये ४ लाख १२ हजार ५२० नवीन घरे बाजारात उपलब्ध झाली होती. यावर्षी ४ लाख १९ हजार १७० घरे नव्याने उपलब्ध झाली. यापैकी ४८ टक्के घरे केवळ महामुंबई आणि बंगळुरू या शहरांतील आहेत.
देशातील ७ शहरांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांची सरासरी किंमत यावर्षी ८ टक्क्यांनी वाढली. गेल्या वर्षी चौथ्या तिमाहीमध्ये घरांचा दर ८ हजार ५९० रुपये प्रति चौरस फूट होता. यावर्षी चौथ्या तिमाहीमध्ये घरांचा दर ९ हजार २६० रुपये प्रति चौरस फूट इतका होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४ टक्के घरे विक्रीविना शिल्लक राहिली.