

विधिमंडळाच्या अधिवेशनात चित्रपटांतील राजकीय बदनामीवर सुरू असलेली एक गंभीर चर्चा, राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या एका मिश्किल पण तितक्याच भेदक टोलेबाजीने गाजली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर, ‘‘दोन बंधू एकत्र येत आहेत, तर आता ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी त्यांची अवस्था झाली आहे,’’ असे म्हणत मंत्री शेलार यांनी थेट ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला.
या राजकीय नाट्याची सुरुवात भाजपचे आमदार परिणय फुके यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या एका प्रश्नाने झाली. फुके यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना म्हटले की, ‘चित्रपटांमध्ये कोणताही गुन्हा, कट-कारस्थान किंवा नकारात्मक घटना घडली की, त्याचा सूत्रधार म्हणून हमखास एखादा लोकप्रतिनिधी किंवा राजकीय नेताच दाखवला जातो. या चित्रणामुळे संपूर्ण राजकीय वर्गाची प्रतिमा समाजात मलिन होत आहे. हे कितपत योग्य आहे? यावर सरकारने काहीतरी भूमिका घ्यावी,’ अशी मागणी त्यांनी केली.
विधानपरिषदेतील कामकाजादरम्यान आमदार फुके यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, अलीकडच्या काळात प्रदर्शित होणाऱ्या अनेक चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये कथेला नाट्यमय वळण देण्यासाठी राजकीय नेत्यांना खलनायक म्हणून रंगवले जात आहे.
आमदार फुके यांच्या गंभीर प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मंत्री आशिष शेलार उभे राहिले. त्यांनी सुरुवातीला या विषयाची दखल घेतली जाईल असे संकेत दिले, मात्र उत्तराच्या ओघात त्यांनी राजकीय ‘टायमिंग’ साधत एक अशी टिप्पणी केली, ज्यामुळे सभागृहाचे वातावरणच बदलून गेले.
शेलार यांनी प्रसिद्ध मराठी चित्रपट ‘झेंडा’ चा उल्लेख केला. हा चित्रपट एका मोठ्या राजकीय पक्षातील फुटीनंतर कार्यकर्त्यांची झालेली द्विधा मनस्थिती आणि नेत्यांमधील संघर्षावर आधारित होता. याच चित्रपटाचा संदर्भ देत शेलार म्हणाले, ‘‘राजकारणावर आधारित प्रसंग निहाय सिनेमे आपल्याकडे येतात. आता सध्या चर्चा आहे की दोन बंधू एकत्र येत आहेत. त्यामुळे त्यांची अवस्था आता ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ अशी झाली आहे.’’
शेलार यांच्या या वाक्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. त्यांचा रोख स्पष्टपणे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य एकत्र येण्यावर होता. शिवसेनेतील फुटीनंतर दोन्ही भावांच्या राजकीय भूमिका आणि झेंड्यांचे रंग बदलले आहेत. आता ते एकत्र आल्यास नेमका कोणता विचार किंवा कोणता ‘झेंडा’ घेऊन पुढे जाणार, यावरून त्यांची राजकीय कोंडी झाल्याचे चित्र शेलार यांनी आपल्या या एका वाक्यात उभे केले.
चित्रपटांमधून होणाऱ्या राजकीय नेत्यांच्या बदनामीविरोधात विधानपरिषदेत उपस्थित झालेल्या प्रश्नाला उत्तर देताना, राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी एकीकडे समाजभावना दुखावल्यास कारवाईचे आश्वासन दिले, तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाला जोरदार कोपरखळी मारली. ‘मध्यंतरी दोन पक्ष झाल्यावर 'कोणता झेंडा घेऊ हाती' नावाचा चित्रपट आला होता,’ असा खोचक उल्लेख करत शेलार यांनी सभागृहात राजकीय टोलेबाजीची धार दाखवली.
भाजप आमदार फुके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री आशिष शेलार यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आम्ही पूर्ण आदर करतो, मात्र या स्वातंत्र्याचा वापर करून जर हेतुपुरस्सर एखाद्या वर्गाची, विशेषतः राजकीय नेत्यांची प्रतिमा मलिन केली जात असेल किंवा त्यामुळे समाजभावना दुखावल्या जात असतील, तर सरकार त्याची निश्चितपणे दखल घेईल. अशा प्रकरणांमध्ये कायद्याच्या चौकटीत राहून योग्य ती कारवाई केली जाईल.’
त्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या कामाची माहिती देताना सांगितले की, केवळ २०२४-२५ या एका वर्षात बोर्डाकडे तब्बल १५ हजारांहून अधिक चित्रपट, वेब सिरीज आणि माहितीपट प्रमाणपत्रासाठी आले आहेत. या प्रचंड संख्येमुळे प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवणे आव्हानात्मक असले तरी, आक्षेपार्ह बाबींवर कारवाई केली जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.