

मुंबई: घाटकोपर, दादर येथून सुरू झालेला पांढऱ्या पट्ट्यांचा वाद मराठीबहुल गिरगावपर्यंत पोहोचला असून यामुळे मुंबईतील वातावरण तापले आहे. गिरगावात शनिवारी रात्री व रविवारी सकाळी दोन ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांची आखणी करण्यात आली.
याला विरोध करीत स्थानिकांनी त्यावर काळया रंगाच्या उभ्या, आडव्या रेषा आणि फुल्या मारून निषेध केला. मात्र पाेलिसांनी विरोध करणार्यांनाच ताब्यात घेतल्याने गिरगावातील वातावरण चांगलेच तापले आहे.
शनिवारी रात्री गिरगाव चौपाटी येथील बेने हॉटेलसमोरील पदपथावर पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यांची आखणी करण्यात आल्याचे समजताच काही गिरगावकर मंडळी घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. पांढऱ्या पट्टीवर त्यांनी काळया रंगाच्या उभ्या, आडव्या रेषा आणि फुल्या मारून निषेध केला. असे फालतू नखरे गिरगावकर खपवून घेणार नाहीत, असा इशाराही दिला आहे.
मात्र पोलिसांनी या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना गावदेवी पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. त्यामुळे गिरगावमध्ये तणाव वाढला होता. रात्र तणावात गेल्यानंतर रविवारी सकाळी पालिका प्रशासन आणि पोलिसांनी पांढऱ्या पट्ट्यांवर लाल रंगाचा हात मारून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
गिरगावकरांत रात्रीच्या घटनेचा राेष असतानाच रविवारी सकाळी पुन्हा मंगलवाडी परिसरातही हाच प्रकार सुरू झाला. रहदारीच्या रस्त्यावर एक जण पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारत होता. त्यामुळे संतप्त गिरगावकरांनी त्याला जाब विचारला. त्यानंतर मंगलवाडीतील रस्त्यावर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यावरही गिरगावकरांनी काळा रंग मारला.
या प्रकारामुळे येथील वातावरण चांगलेच तापले आहे. जाणूनबुजून मराठी माणसांना भडकवण्याचे काम सुरू आहे. मुंबईत आलात तर प्रेमाने राहा, असले धंदे स्वतःच्या राज्यात जाऊन खुशाल करा, असा इशारा आम्ही गिरगावकरांनी दिला आहे.