Cardiac Arrest : कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय? शेफालीच्या मृत्यूलाही हेच कारण? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

Shefali Jariwala cardiac arrest : कार्डियाक अरेस्ट म्हणजे नेमके काय? याचा धोका कोणाला असतो आणि तो हार्ट अटॅकपेक्षा वेगळा आहे का? जाणून घ्या सविस्तर.
Cardiac Arrest : कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय? शेफालीच्या मृत्यूलाही हेच कारण? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय
Published on
Updated on

मुंबई : 'काटा लगा गर्ल' अभिनेत्री शेफाली जरीवालाचे (४२ वर्षे) शुक्रवारी मुंबईत निधन झाले. तिचा पती पराग त्यागी शेफालीला घेऊन मुंबईतील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता, परंतु उपचारापूर्वीचं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शेफालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, मृत्यूचंं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, प्राथमिक अहवालांमध्ये मृत्यूचे कारण कार्डियाक अरेस्ट असल्याचे सांगितले जात आहे. आता तुमच्या मनातही प्रश्न निर्माण झाला असेल की, हा कार्डियाक अरेस्ट म्हणजे नेमके काय? तो हार्ट अटॅकपेक्षा वेगळा आहे का? आणि याचा धोका कोणाला असतो?

कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट अटॅक, दोन्ही वेगळे आहेत का? 

कार्डियाक अरेस्ट (Sudden Cardiac Arrest) म्हणजे हृदयाची सर्व क्रिया अचानक बंद पडणे. यामध्ये अचानक श्वास थांबतो आणि व्यक्ती बेशुद्ध होते. जर यावर वेळेवर उपचार झाले नाहीत, तर मृत्यू होऊ शकतो. डॉक्टरांच्या मते, कार्डियाक अरेस्टच्या स्थितीत आपत्कालीन उपचार म्हणून त्वरित सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) दिल्यास जीव वाचण्याची शक्यता असते. हार्ट अटॅकच्या तुलनेत कार्डियाक अरेस्टला अधिक गंभीर आणि घातक मानले जाते.

अनेकदा आपण सर्वजण कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट अटॅक याला एकच समस्या समजण्याची चूक करतो, पण या दोन्हींमध्ये बरेच फरक आहेत. हार्ट अटॅक ही कोरोनरी धमन्यांमध्ये (हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या) अडथळा निर्माण झाल्यामुळे होणारी समस्या आहे. या स्थितीत हृदयापर्यंत रक्त आणि ऑक्सिजन पोहोचत नाही. ही स्थिती जीवघेणी ठरू शकते. तर, कार्डियाक अरेस्ट तेव्हा होतो जेव्हा व्यक्तीचे हृदय रक्त पंप करणेच थांबवते. या स्थितीत रुग्ण सामान्यपणे श्वास घेऊ शकत नाही. या दोन्ही स्थिती जीवघेण्या मानल्या जातात.

Cardiac Arrest : कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय? शेफालीच्या मृत्यूलाही हेच कारण? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय
Shefali Jariwala Passes Away: 'कांटा लगा' फेम शेफाली जरीवालाचे निधन, हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली

कार्डियाक अरेस्टचे कारण काय?

डॉक्टर सांगतात की, हृदयाच्या विद्युत प्रणालीतील बदलांमुळे ही समस्या उद्भवते. या बदलामुळे हृदय रक्त पंप करणे थांबवते आणि शरीरात रक्तप्रवाह होऊ शकत नाही. या स्थितीत छातीत दुखणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, बेशुद्ध किंवा चक्कर येणे यासारख्या समस्या होऊ शकतात. ज्यांना आधी कोणताही हृदयरोग नाही अशा लोकांमध्ये देखील कार्डियाक अरेस्ट होऊ शकतो. ज्यांना आधीच समस्या आहे किंवा हृदयविकाराचा झटका आला आहे, त्यांना कार्डियाक अरेस्टचा धोका जास्त असतो. उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा आणि मधुमेह असेल तर धोका आणखी वाढतो, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

कार्डियाक अरेस्ट झाला आहे हे कसे ओळखावे?

कार्डियाक अरेस्टची लक्षणे आधी दिसून येत नाहीत. कार्डियाक अरेस्ट अचानक होतो आणि हार्ट अटॅकच्या तुलनेत यामध्ये रुग्णाच्या जीवाला धोकाही अधिक असू शकतो. कार्डियाक अरेस्टची लक्षणे तात्काळ आणि गंभीर असतात, ज्यांच्याकडे वेळेवर लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. जर एखादी व्यक्ती अचानक बेशुद्ध झाली असेल, श्वास घेत नसेल, तर हे कार्डियाक अरेस्टचे संकेत असू शकतात. कधीकधी सडन कार्डियाक अरेस्टपूर्वी काही लोकांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या दिसू शकतात, ज्यांच्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. यामध्ये अस्वस्थता, धाप लागणे, अशक्तपणा जाणवणे, हृदयाचे ठोके वाढणे यासारख्या समस्या असू शकतात, ज्याकडे दुर्लक्ष करू नये. कार्डियाक अरेस्टमध्ये नाडी आणि रक्तदाब थांबतो. अशा स्थितीत मेंदू आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त पोहोचू शकत नाही. या सर्व गोष्टी खूप वेगाने घडत असतात. यामुळेच कार्डियाक अरेस्टला अधिक धोकादायक मानले जाते.

कार्डियाक अरेस्ट टाळण्यासाठी काय करावे?

हृदयाचे आरोग्य चांगले ठेवणारी जीवनशैली आणि योग्य आहार पद्धतींचा अवलंब करून कार्डियाक अरेस्ट टाळता येतो. यासाठी हृदयासाठी आरोग्यदायी आहाराचे सेवन, नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात ठेवणे आणि धूम्रपान टाळणे आवश्यक आहे. कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट अटॅक या दोन्ही स्थितींमध्ये सीपीआर (CPR) ही एक जीवनरक्षक पद्धत मानली जाते, जी सर्वांनी शिकून घेणे आवश्यक आहे. (ही माहिती वैद्यकीय अहवालांवर आधारित दिली आहे. कोणतीही लक्षणे दिसत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news