

मुंबई : भांडुप, विक्रोळी, पवई, कांजूरमार्ग आदी भागात सोमवारी पाणी कपातीचा चांगलाच फटका बसला. ठिकठिकाणी पाणीटंचाई भासल्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागले. हा त्रास शुक्रवार, 26 डिसेंबरपर्यंत सुरूच राहणार आहे.
एमएमआरडीएच्या मेट्रो लाईन 7 अ प्रकल्पाच्या कामासाठी 2400 मिमी व्यासाच्या अपर वैतरणा मुख्य जलवाहिनीचा काही भाग वळविण्यात आला आहे. या वळवलेल्या भागाचे क्रॉस कनेक्शनचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम शुक्रवारी मध्यरात्री एकपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे 87 तास भांडुप एस विभागातील भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
सोमवारी पहिल्याच दिवशी कमी दाबाने आलेल्या पाणी पुरवठ्याचा चांगलाच परिणाम झाला. पाण्याचा दाब नसल्यामुळे अनेक भागात पाणीच पोहचले नाही. त्यामुळे भांडुप, कांजूर, विक्रोळी या भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. परंतु टँकरचे पाणीही कमी पडल्यामुळे या भागातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
भांडुप पश्चिम, क्वारी मार्ग, टेंभी पाडा, कोकण नगर, समर्थनगर, भट्टी पाडा, उत्कर्षनगर, श्रीरामपाडा, त्रिमूर्ती नगर, वाघोबावाडी , तानाजीवाडी, रामनगर, शिवाजीनगर येथे पहाटे 5 ते सकाळी 10पर्यंत नेहमीच पाणीपुरवठा होतो. मात्र सोमवारी काही भाग वगळता अन्य भागात दहा टक्केही पाणी मिळाले नाही. विक्रोळी पश्चिम, साई हिल, साकी विहार, रमाबाई नगर पंपिंग सप्लाय, हनुमाननगर, फुलेनगर पंपिंग सप्लाय, खिंडीपाडा आदी भागात कमी दमाने पाणीपुरवठा झाल्यामुळे नागरिकांना टँकर मागवावे लागले.
पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन
भांडुप एस विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.