Virar building collapse: विरारमध्ये ४ मजली इमारत कोसळली; पहिला वाढदिवस साजरा केला अन् काही क्षणातच चिमुकलीसह कुटुंबाचा अंत झाला

विरार पूर्वेकडील विजय नगर परिसरात मंगळवारी मध्यरात्री एका चार मजली इमारतीचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली.
Virar building collapse
Virar building collapsefile photo
Published on
Updated on

Virar building collapse:

विरार : विरार पूर्वेकडील विजय नगर परिसरात मंगळवारी मध्यरात्री एका चार मजली इमारतीचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आई-वडील आणि त्यांच्या एक वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला आहे. चिमुकलीचा पहिला वाढदिवस साजरा केल्यानंतर काही तासांतच काळाने घाला घातला. अजूनही २० ते २५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. मृतांमध्ये आरोही जोविल (२४ वर्षे) आणि तिची एक वर्षांची मुलगी उत्कर्षा जोविल यांचा समावेश आहे. आणखी एका महिलेला उपचारादरम्यान प्राण गमवावे लागले.

जखमींमध्ये प्रभाकर शिंदे (५७), प्रमिला शिंदे (५०), प्रेरणा शिंदे (२०), विशाखा जोविल (२४), मंथन शिंदे (१९), संजय सिंग (२४), मिताली परमार (२८) यांचा समावेश आहे. तर प्रदीप कदम (४०) आणि जयश्री कदम (३३) या दोघांना प्रथमोपचारानंतर घरी सोडण्यात आले. सर्व जखमींवर विरार आणि नालासोपारा येथील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

नेमके काय घडले?

विरार पूर्वेच्या नारिंगी परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीत मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. इमारतीच्या चौथ्या मजल्यापासूनचा स्लॅबसह मोठा भाग खचला आणि थेट खाली असलेल्या चाळींवर कोसळला. या इमारतीत सुमारे ३० ते ३५ कुटुंबे वास्तव्यास होती. रात्रीची वेळ असल्याने बहुतेक रहिवासी घरातच होते, ज्यामुळे गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. इमारतीचा ढिगारा बाजूच्या चाळीवर पडल्याने तेथील नागरिकही जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, वसई-विरार महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून आठ ते नऊ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असले तरी, अजूनही काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पहिला वाढदिवसच ठरला अखेरचा

या दुर्घटनेने एका कुटुंबाचा संपूर्ण दिवाच विझवला. ज्या चिमुकलीचा मंगळवारी पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, त्याच चिमुकलीचा तिच्या आई-वडिलांसह ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. वाढदिवसाचे सेलिब्रेशन केल्यानंतर काही वेळातच ही दुर्घटना घडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news