

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गातील भिलाड रेल्वे स्थानकात प्रवेश करत असताना विरार-भरूच मेमू ड्रायव्हिंग मोटर कोचची चार चाके अचानक रुळावरून घसरली. मंगळवारी सकाळी ६.२७ वाजता ही घटना घडली.
या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा प्रवासी, रेल्वे कर्मचाऱ्यांना दुखापत झालेली नाही. मात्र या घटनेमुळे पाऊणे पाच तास वाहतूक खोळंबली होती. इतर ही एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम दिसून आला.
या घटनेची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेचे वलसाड अपघात निवारण पथक आणि रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर युद्धपातळीवर रेल्वे डब्बा पुन्हा रुळावर आणण्याचे काम हाती घेण्यात आले.
या दरम्यान, पश्चिम रेल्वेवरील वाहतुकीवर त्याचा परिणाम दिसून आला. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावत होत्या. तसेच गुजरातकडून येणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्यांना उशीर होत होता. इंटरसिटी एक्स्प्रेस विरार स्थानकात ३० मिनिटांहून अधिक काळ थांबविण्यात आली होती.
मोटर कोचची चार चाके रुळावर पूर्ववत करायला रेल्वे कर्मचाऱ्यांना खूप वेळ लागत होता. अखेर ११.१५ वाजता डाउन मार्गावरील कॉमन लूपवरील अडथळा पूर्णपणे हटवण्यात आला. त्यानंतर अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघाताची घटना घडल्यानंतर पावणे ५ तास वाहतूक विस्कळीत झाली होती. त्याचा प्रचंड त्रास प्रवाशांना झाला.