विनोद तावडेंना मिळणार नवी जबाबदारी

विनोद तावडेंना मिळणार नवी जबाबदारी
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : 2019 नंतर काहीसे बाजूला पडलेले विनोद तावडे यांचे नाव बिहारमधील यशस्वी कामगिरीनंतर आता थेट भाजप अध्यक्षपदाच्या स्पर्धेत घेतले जात आहे. विनोद तावडेेंना मोठी जबाबदारी मिळणार, असे सुतोवाच राज्यातील भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनीही केले आहे.

विनोद तावडे हे 2014 मध्ये शिक्षणमंत्री होते. देवेंद्र फडणवीस पूर्ण काळ यावेळी मुख्यमंत्री होते. या काळात तावडे यांचे पंख छाटण्याचे काम झाले होते. 2019 ला त्यांचे मुंबईतून तिकीट कापण्यात आले होते. मात्र दिल्लीत त्यांनी दरम्यानच्या काळात आपले प्रस्थ निर्माण करत एनडीएतून बाहेर गेलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना एनडीएत आणून मोठी जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर तावडेंचे भाजपतील महत्त्व अधोरेखित झाले. जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. आता तावडेंचे नाव भाजपच्या अध्यक्षपदासाठी घेतले जाऊ लागले आहे.

तावडे हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द मात्र मुंबईत बहरली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री अशी पदे त्यांनी भूषविली. सध्या ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. आता भाजप अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने राज्यातील त्यांचे वजनही वाढले आहे. राज्यात फडणवीस मुख्यमंत्री असताना तावडे विरुद्ध फडणवीस, असेही वाद काही काळ रंगले होते. आता तावडेंचे थेट राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नाव घेतले जात असल्याने राज्यातील भाजपमध्ये नवे राजकीय समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

देशात भाजपप्रणीत रालोआ सरकार स्थापन झाले आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून तिसर्‍यांदा शपथ घेतली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही मंत्रिपद देण्यात आले असून, ते देशाचे आरोग्यमंत्री आहेत. त्यामुळे भाजपकडून नवे अध्यक्ष निवडले जाणार, हे स्पष्ट आहे. यासाठी विनोद तावडेंचे नाव चर्चेत आहे. अशात चंद्रकांत पाटील यांनी एक महत्त्वाचे सूचक वक्तव्य केले आहे.

तावडे कर्तृत्ववान आहेत. त्यांना जिथे पाठवू तिथे यश कसे मिळेल याचे बारकावे ते शोधतात. 1995 ला ते महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस झाले. त्यानंतर चारच वर्षांत ते भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष झाले. अखिल भारतीय सरचिटणीस म्हणून दिल्लीला गेले. आता ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. पक्ष चालवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. विनोद तावडेंना कुठली जबाबदारी द्यायची ते वरिष्ठ ठरवतील. एखाद्या व्यक्तीचा संबंधित पदावरचा कार्यकाळ संपल्यावर त्याला बदलले जाते. तावडेंबाबत अनेक पर्याय आहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. काहीही झाले तरीही विनोद तावडे मोठेच होतील आणि मला याचा खूप आनंद आहे, असे पाटील यांनी सांगितले.

पक्षादेश महत्त्वाचा : चंद्रकांत पाटील

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाला. भाजपच्या खासदारांची संख्या 23 वरून थेट नऊपर्यंत खाली घसरली. यानंतर उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपचे पहिल्या क्रमांकाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी, सरकारमधून बाहेर पडून पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. या सगळ्याविषयी चंद्रकांत पाटील यांनी, भाजप पक्षसंघटनेत नेत्याच्या इच्छेपेक्षा पक्षादेश महत्त्वाचा असतो. नेत्याने फक्त इच्छा व्यक्त करायची असते, आज्ञा करायची नाही. त्यामुळेच आम्ही टिकून आहोत. अमित शहा यांनी फडणवीसांना थांबण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी तो निर्णय मागे घेऊन पुन्हा कामाला सुरुवात केली आहे, असे पाटील म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news