

मुंबई : व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रात सुमारे 6.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. विन ग्रुप कंपनीने बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासोबत सामंजस्य करार केला.
जागतिकस्तरावरील आघाडीची डेटा सेंटर कंपनी ‘इक्विनिक्स’च्या मुंबईतील ‘एमबी-3’ या पहिल्या स्वमालकीच्या डेटा सेंटरचे उद्घाटन बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थानी करण्यात आले. विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राज्यात शाश्वत विकास, हरित ऊर्जा, आधुनिक पायाभूत सुविधा आणि गतिशील वाहतूक व्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन आणि विन ग्रुपचे आशियातील मुख्य कार्यकारी अधिकारी फाम सान्ह चाऊ यांनी करारावर स्वाक्षरी केल्या.
मुंबई व रायगड परिसर हा भविष्यात जागतिकस्तरावर स्पर्धा करणारा सर्वात गतिमान शहरी भाग ठरणार आहे. राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा गुंतवणूकदारांना पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
विन ग्रुपकडून येत्या दोन वर्षांत सुमारे 6.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक प्रस्तावित असून, 5 हजार एकर क्षेत्रावर विविध प्रकल्प उभारले जाणार आहेत. या माध्यमातून सुमारे 24 हजार 700 थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
या करारानुसार स्मार्ट निवासी टाऊनशिप, इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्स, सामाजिक व सार्वजनिक पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा, पर्यटन व मनोरंज या क्षेत्रात विन ग्रुप गुंतवणूक करणार आहे. सुमारे 2 हजार 700 एकर क्षेत्रावर जागतिक दर्जाची, पर्यावरणपूरक आणि एकात्मिक टाऊनशिप विकसित केली जाणार असून, सुमारे दोन लाख लोकसंख्येचा विचार करण्यात आला आहे.
त्याचबरोबर राज्यातील इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी इलेक्ट्रिक टॅक्सीसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव असून, मोबिलिटी-एज-अ-सर्व्हिस प्लॅटफॉर्मही विकसित केला जाणार आहे. विनस्कूलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा, विनमेकच्या माध्यमातून मल्टिस्पेशालिटी रुग्णालये तसेच व्ही ग्रीनमार्फत राज्यभर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग नेटवर्क उभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 170 एकर क्षेत्राचा वापर होणार आहे.
याशिवाय 500 मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारून स्वच्छ ऊर्जानिर्मितीवर भर दिला जाणार आहे. त्यासाठी 1 हजार 200 एकर जमीन आवश्यक आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी 865 एकर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा थीम पार्क, प्राणिसंग्रहालय आणि सफारी प्रकल्प उभारण्याची योजना आहे. यामुळे पर्यटनवृद्धीसह मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे.