Vijaya Mehta | मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन!

वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, नाट्यक्षेत्रावर शोककळा
Vijaya Mehta
Vijaya Mehta pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मराठी रंगभूमीच्या आघाडीच्या, प्रयोगशील दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांचे मंगळवारी सायंकाळी वृध्दापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या, त्यांच्या पश्चात मुलगा रवी, देवेन, मुलगी अनहिता, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मराठी रंगभूमीवर प्रयोगशील आणि नवीन कल्पनांची मुहूर्तमेढ करणाऱ्या विजया या समस्त रंगकर्मीसाठी बाई होत्या. मराठी रंगभूमीवर आणि चित्रपटात कार्यरत असलेल्या अनेक दिग्गजांचे पहिलं पाऊल विजया मेहता यांच्या अभिनयाच्या विद्यापीठातच पडले.

४ नोव्हेंबर १९३४ मध्ये बडोद्यात जन्मझालेल्या विजयाताईंनी दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून अभिनयाचे धडे गिरवले. नाट्य प्रशिक्षक इब्राहिम अल्काझी यांच्यासारख्या निष्णात नाट्य प्रशिक्षकाकडून त्यांनी नाटकातले बारकावे टिपले. अभिनेते श्रीराम लागू आणि नाटककार विजय तेंडुलकर यांच्यासमवेत त्यांनी रंगायन या नाट्यसंस्थेची मुहूर्तमेढ केली. शांतता कोर्ट चालू आहे, बॅरिस्टर, सखाराम बाईंडर यासारख्या रंगभूमीवर मैलाचा दगड ठरणाऱ्या नाटकांची निर्मिती केली. रंगायनने संहितेपासून सादरीकरणापर्यंत नवनवीन प्रयोग करून मराठी नाट्यसृष्टीला एक नवी दिशा दिली, त्यात अरूण काकडे, श्रीराम लागू यांच्या समवेत विजयाबाईंचा मोलाचा वाटा होता.

Vijaya Mehta
Pune Marathi Film Festival: बालगंधर्व रंगमंदिरात ‘रुपेरी चित्रकथा’ महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विजयाबाईंनी हमीदाबाईची कोठीसारख्या नाटकातून बदलते युग आणि कलावंतांची होणारी ससेहोलपट यांचे अत्यंत वास्तववादी चित्रण केले. यात नाना पाटेकर नीना कुलकर्णी आणि अशोक सराफ यांच्यासमवेत स्वतः बाईंनी हमीदाबाईची भूमिका साकारली होती.

उच्च कोटीच्या माणूस

अभिनेत्री वंदना गुप्ते म्हणाल्या बाईंचा आणि माझा ४० वर्षांपासून परिचय. गेले काही महिने त्या झोपून होत्या. त्या माझ्या गुरू होत्या. पण प्रगल्भ नाट्य दिग्दर्शिका आणि अभिनेत्री याबरोबरच त्या उच्च कोटीच्या माणूस होत्या. मी १८-१९ वर्षांची असताना बाईकडे नाटकात काम करायला गेले. बाईंनी मला त्यांच्या पंखाखाली घेतले. मला आणि दया डोंगरेला त्यांनी रंगभूमीवन कसं वावरायचं इथपासून ते एक सशक्त व्यक्तिमत्व म्हणून कसं राहायचं हे शिकवलं. भूमिकेतून कस स्वीच ऑन आणि ऑफ कसं व्हायच हेही शिकवलं.

प्रेक्षकांना नाटकाचा जिवंत अनुभव कसा द्यायचा आणि प्रत्येक प्रयोगात नवेपण कसं आणायचं हेही सांगितलं. त्यांना मी कधी हिरमुसलेलं बघितलंच नाही. अतिशय जिव्हाळा आणि माया केली त्यांनी आमच्यावर. त्यांनी दिलेल्या शिदोरीवरच मी आणि माझ्यासह अनेक कलाकारांची रंगभूमीवरची अव्याहत वाटचाल सुरू आहे.

माझ्यासाठी त्या आयुष्य

अभिनेत्री भारती आचरेकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, त्या नीना कुलकर्णी, नाना पाटेकर आणि माझ्यासाठी आयुष्य होत्या. आम्ही दोनच नाटकात काम केली होती. मैत्रीण, आई, आजी, गुरू होत्या. वर्षातून एकदा त्यांना घेऊन जेवायला जायचो. गुरू म्हणून तर त्यांचा अभिमान होताच, पण एक माणूस म्हणून त्यांचा खूप अभिमान होता.

गाजलेली नाटके

अजब न्याय वर्तळाचा एक होती/कलियुग (चित्रपट)/क्वेस्ट (इंग्रजी चित्रपट) / जास्वंदी / पुरुष / पेस्तनजी (हिंदी चित्रपट/) /बॅरिस्टर / मला उत्तर हवंय / मादी /रायडिंग द बस विथ माय सिस्टर (इंग्रजी चित्रपट) / रावसाहेब (चित्रपट) / लाईफलाईन (इंग्रजी चित्रवाणी मालिका) / वाडा चिरेबंदी / शाकुंतलम (चित्रवाणी चित्रपट) /श्रीमंत/स्मृतिचित्रे (दूरचित्रवाणी मालिका)/हयवदन/हमिदाबाईची कोठी (नाटक आणि दूरचित्रवाणी मालिका)/हवेली बुलंद थी (हिंदी चित्रपट) पुरस्कार : पद्मश्री एस.एन.डी.टी. विद्यापीठाकडून : डॉक्टरेट/कालिदास सन्मान / चतुरंग प्रतिष्ठानचा २०१२ सालचा जीवनगौरव पुरस्कार / नाट्यदर्पण पुरस्कार / महाराष्ट्र सरकारचा नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कार नावाचा जीवनगौरव पुरस्कार / 'झिम्मा' या आत्मकथनाला भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार / रूपवेध प्रतिष्ठानचा तन्वीर सन्मान हा पुरस्कार । 'झिम्मा'ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार.

Vijaya Mehta
Marathi Theatre Discussion: मराठी रंगभूमीला नव्या दिशेची गरज; श्रीराम लागू नाट्य महोत्सवात रंगले विचारमंथन
  • विजया मेहता यांनी 'झिम्मा' हे आत्मचरित्र लिहिले आहे. हे नुसतेच आत्मचरित्र नाही, तर मराठी रंगभूमीचा इतिहास आहे असे प्रशंसकांचे म्हणणे आहे. विजया मेहता यांच्या नाट्य-कारकिर्दीवर 'बाई- एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास' नावाचे पुस्तक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news