

vegetables become expensive by 15 percent
नवी मुंबई: राजेंद्र पाटील
राज्य आणि परराज्यातून मुंबई एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात दररोज सरासरी 550 ते 630 गाड्यांची आवक होते. मात्र गेल्या दहा ते बारा दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने एकीकडे आवक घटली असताना दुसरीकडे पावसाने पालेभाज्या भिजल्याने बाजारात येण्याआधी गाडीतच सडल्या. यामुळे या दहा दिवसांत तब्बल 40 ते 45 लाख जुड्या फेकून देण्याची वेळ घाऊक व्यापार्यांवर आली. परिणामी, पावसामुळे पालेभाज्यांच्या दरात जवळपास 15 टक्क्यांनी महागल्याची माहिती व्यापारी सुत्रांनी दिली.
एपीएमसीत गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे चार ते पाच दिवस किरकोळ व्यापार्यांनी पाठ फिरवल्याने 50 टक्के भाजीपाला गाळ्यात पडून होता. यामुळे आवक घटली आणि परिणामी किरकोळ बाजारात तेजी नसताना तेजी आली. तर पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. एपीएमसीत रोज सुमारे 4 ते 5 लाख पालेभाज्यांच्या जुड्यांची आवक होते. त्यापैकी 70 ते 80 टक्के माल फेकण्यात आला.
तर उर्वरित माल कमी अधिक दराने विक्री केला गेला. नाशिक, पुणे, लातुर आणि कर्नाटक येथून मुंबई एपीएमसीत भाजीपाला, पालेभाज्यांची आवक होते. मात्र मुसळधार पावसाने शेतकर्यांच्या बांधावर तर काही ठिकाणी आडत्याच्या दारात पालेभाज्या पाणी लागल्याने सडल्या. ज्या काही मुंबईत पोहचल्या त्यांना ही प्रवासात मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने तो माल बाजारात खाली होण्याआधी गाडीतच सडल्याने फेकून देण्याची वेळ व्यापार्यांवर आली.
सलग 10 ते 12 दिवसांत सुमारे 35 ते 40 लाख पालेभाज्यांच्या जुड्या फेकण्यात आल्या. याचा भुर्दंड व्यापार्यांना, अडतदारांना बसला. हमाली, तोलाई, वाहतूक खर्च, बारदान खर्च, पोस्ट खर्च, आडत हा न चुकता द्यावा लागला. शिवाय माल खराब झाला, सडला , फेकून दिला असला तरी व्यापार्यांना शेतकर्यांच्या नावे काटापट्टी काही रक्कमेची ही द्यावी लागते. अशी स्थिती आज एपीएमसीत आहे. यामुळे व्यापारी आणि आडते यांचे सुमारे 20 ते 25 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती व्यापारी भाऊसाहेब भोर यांनी दिली.