Trans Harbour Line Disruption : होर्डिंगची दोरी पडल्याने ट्रान्स हार्बरची सेवा ठप्प

२५ मिनिटांनंतर लोकल वाहतूक पुन्हा सुरु
Trans Harbour Line Disruption
Trans Harbour Line Disruptionpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : एका जाहिरात फलकाची (होर्डिंग) दोरी रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर पडल्यामुळे बुधवारी सकाळी ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. वाशी रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ जवळ सकाळी ८:३५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जवळपास २५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतर सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दोरी हटविण्यात आली. आणि त्यानंतर लोकल वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.

सुरक्षेचा उपाय म्हणून वाशीहून ठाण्याच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक तात्काळ थांबविण्यात आली होती. यामुळे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी हा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे नोकरदार आणि कामावर जाणाऱ्या हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या घटनेमुळे वाशीहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या खोळंबल्या होत्या. त्यानंतर मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी पथकाकडून ओव्हरहेड वायरवरील दोरी हटविण्याचे काम हाती घेण्यात आले.

Trans Harbour Line Disruption
Dia Mirza Pollution Awareness Video : न्यायालयाचा आदेशही जुमानेना!

प्रवाशांचा रेल्वे रुळांवरून पायी प्रवास

लोकल अचानक थांबल्याने हजारो प्रवासी गाड्यांमध्ये अडकून पडले होते. रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक पूर्ववत होण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा उद्घोषणा दिली जात नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अखेर कंटाळून आणि कार्यालयात पोहोचण्यास उशीर होत असल्याने अनेक प्रवाशांनी लोकलमधून खाली उतरून रेल्वे रुळांवरून पायी चालत जवळचे स्थानक गाठणे पसंत केले.

Trans Harbour Line Disruption
Maharashtra Drought Relief Fund : दुष्काळ निधीसाठी केंद्राला ५७ हजार कोटींचा सुधारित प्रस्ताव

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

  • रेल्वे मार्गालगत उभारण्यात येणाऱ्या जाहिरात फलकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.

  • फलकांना बांधलेल्या दोऱ्या किंवा इतर साहित्य रेल्वेच्या विद्युत वाहिन्यांपर्यंत पोहोचल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • त्यामुळे रेल्वे परिसरातील जाहिरात फलकांची नियमित तपासणी करण्याबरोबरच संबंधित यंत्रणांची जबाबदारी निश्चित करण्याची गरज निर्माण झाली आहे.

तांत्रिक बिघाडाच्या घटनांमध्ये वाढ

या सर्व घटनेत ट्रान्स-हार्बर मार्गावरील वाहतूक २५ मिनिटे पूर्णपणे बंद होती. सकाळी ९ वाजता वाहतूक पुन्हा सुरू झाली. या खोळंब्याचा परिणाम पुढील अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर झाला. आणि लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर कधी केबल, कधी कापड तर कधी जाहिरात फलकाची दोरी पडण्याचे प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.