

वाशी : कोपरखैरणे ते वाशीपर्यंतची वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने वाशी येथे पामबीच मार्गालगत मिसिंग लिंक प्रकल्प अंतर्गत पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेसाठी पूल तयार केला आहे. लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कामासाठी सुमारे 16 कोटी रुपये खर्च झाला आहे.
नवी मुंबईच्या नागरीकरणात वाढ झाल्याने वाहतुकीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे काही ठिकाणी नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. घणसोली, कोपरखैरणे, वाशी या भागांतून पुण्याकडे जाणारे प्रवासी रहिवाशी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना कोपरखैरणे, वाशी परिसरातून पुण्याकडे जाण्यासाठी वाशी हायवे येथे यावे लागते.
परिणामी, वाशी ब्लू डायमंड ते वाशी हायवेपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असते. ही कोंडी फोडण्यासाठी पामबीच मार्गावर सेक्टर 17 येथे पुण्याकडे जाण्यासाठी मिसिंग लिंक अंतर्गत पूल बांधण्यात आला आहे. एक वर्षाहून अधिक काळ हे काम चालू होते.
वाहतूक कोंडी फुटणार
मागील महिन्यात हे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे वाशी परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन पुण्याकडे जाणाऱ्या प्रवासी कोपरखैरणे रेल्वे स्टेशनकडून पामबीचने येत पुढे मार्गस्थ होऊ शकतात. तसेच वाशीतून अरेंजा सर्कल येथून पुढे पुण्याच्या दिशेला जाऊ शकतात.