

नवी मुंबई ः नवी मुंबई शहरात वाशी विभागात रात्रीच्या वेळी उशिरापर्यत रस्त्यावर विनापरवाना बस्तान मांडणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना वाशी विभागाच्या अतिक्रमण पथकाने चांगलाच दणका दिला आहे. शुक्रवारी रात्री साडेबारा वाजेपर्यत अतिक्रमण पथकाने कारवाई करुन हातगाड्या हटविल्या त्याचप्रमाणे त्यांच्याकडून एक लाखांहून अधिक रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.
शहरातील अनेक रस्ते, पदपथ आणि चौक हे फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी गिळंकृत केले आहेत. गजबजलेल्या वाशी विभागात तर रात्रीच्यावेळी खाद्यपदार्थ विक्रेते बिनधाकपणे हातगाड्या लावून पदपथ अडवून बसले होते. याची दखल घेत पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार आणि आणि उपआयुक्त (अतिक्रमण) डॉ. कैलास गायकवाड यांच्या निर्देशानुसार वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त सुखदेव येडवे यांच्या समवेत अतिक्रमण पथकाने धडक कारवाई केली.
शुक्रवारी रात्री 11.15 ते 12.30 च्या दरम्यान अतिक्रमण पथक व पोलिसांसह कारवाई करण्यात आली. यात 8 हातगाडयांसह, गॅस सिलिंडर, गॅस शेगडी, टेबल, बाकडे इत्यादी सामान जप्त करण्यात करुन डंम्पिंगला पाठविण्यात आले. तसेच 1 लाख 3 हजाराची दंडात्मक वसुली देखील करण्यात आली आहे. पालिकेने प्रथमच वाशी विभागात रात्रीच्यावेळी धडक मोहिम राबवून हातगाडयांवर कारवाई केल्याने नागरिकांनी कौतूक केले आहे.
यापुढे देखील भविष्यात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्या अशाच वाढत राहिल्यास विशेष मोहिम राबवून हातगाडी पूर्णपणे बंद होत नाहीत तोपर्यंत वारंवार कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहाय्यक आयुक्त सुखदेव येडवे यांनी यावेळी दिला.