

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आता नवीन ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणी आज गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप करत, त्यांना आपल्या मुलीच्या मृत्यूला थेट जबाबदार ठरवलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या लग्नात अनेक गोष्टींसाठी जबरदस्ती केली होती आणि सतत दहशतीखाली ठेवत अमर्यादित मागण्या केल्या.
वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले की, “एमजी हेक्टर गाडी आम्ही बुक केली होती, दरम्यान त्यांनी याचे कागदपत्रही दाखवले. मात्र, हगवणे कुटुंब फॉर्च्युनर गाडीची मागणी करत होते. जर ती गाडी दिली नाही तर आम्ही गाडी पेटवू, लग्नाला येणार नाही आणि लग्न मोडू, अशा धमक्या त्यांनी दिल्या. इतकंच नाही तर वैष्णवीचे याआधी दोन लग्न मोडले गेले होते. हे लग्नही आमच्या मनाविरुद्धच झालं आहे, असंही ते म्हणाले.
त्यांनी आरोप केला की हगवणे कुटुंबाकडून 51 तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी, चांदीची ताटं, मुखवटे आणि पैशांची सतत मागणी केली जात होती. अश्या अनेक मागण्यांसाठी वैष्णवीवर मानसिक दबाव टाकला जात होता. “पाच कोटी नव्वद लाखांची कोणतीही गाडी हगवणेंकडे नसल्याचे त्यांनी स्पष्ट कले. त्यांच्याकडे केवळ एक फोर्ड गाडी आहे. ते सांगत असलेली त्यांची 90 लाखांची गाडीदेखील हगवणे कुटुंबाची नसून ‘MH 14 KC 3000’ चंद्रकांत राहुल बुचडे यांच्या नावावर आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
वैष्णवीच्या वडिलांनी पुढे सांगितले की, जयप्रकाश हगवणे यांनी बाळाची मागणी केली असता, निलेश चव्हाण यांच्याकडून त्यांना बंदुकीचा धाक दाखवण्यात आला. या प्रकरणात निलेश चव्हाण यालाही सहआरोपी करण्याची विनंती त्यांनी केली आहे. “सुपेकरांशी आमचा काहीही संबंध नाही. मात्र ‘आम्ही मामाच्या जीवावर काहीही करू शकतो,’ अशी धमकी हगवणेंकडून आम्हाला सतत दिली जात होती,” असं त्यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, वैष्णवीवर चुकीचे आरोप करण्यात येत आहेत. “आता ते काहीही आरोप करतील, काहीही शिंतोडे उडवतील. पण वकील साहेबांना माझी एकच विनंती आहे की, तुम्हालाही मुलंबाळं आहेत. अशी एखाद्या असहाय्य मुलीवर आरोप करताना विचार करा. माझी मुलगी आता या जगात नाही. तिच्यावर आरोप करू नका,” असे त्यांनी भावनिक आवाहन केलं.