

मुंबई : मेट्रो 3 भुयारी मार्गिकेचा विस्तार कफ परेडपर्यंत झाल्यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीत काहीशी घट झाली आहे. मात्र याचा फटका बेस्ट बससेवा व शेअर रिक्षा या सार्वजनिक परिवहन सेवेला बसला आहे. या प्रवासी साधनांचा वापर करणारे प्रवासी काही प्रमाणात भुयारी मेट्रोकडे वळू लागले आहेत.
आरे ते बीकेसी या भुयारी मार्गिकेला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर यावर्षी ऑक्टोबरमध्ये या मार्गिकेचा विस्तार कफ परेडपर्यंत करण्यात आला. त्यानंतर पहिल्याच दिवशी या मार्गिकेवर दीड लाख प्रवाशांनी प्रवास केला. गेल्या काही दिवसांत या मार्गिकेमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील वाहतूक कोंडीत 30 टक्क्यांनी घट झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. तसेच बेस्ट व शेअर रिक्षाची प्रवासी संख्या घटल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
सध्या भुयारी मेट्रोतून दिवसाला 45 हजार प्रवासी प्रवास करत आहेत. अपेक्षित उद्दिष्टापेक्षा ही संख्या कैकपटीने कमी आहे. जे. जे. उड्डाणपूल, महानगरपालिका मार्ग, हजारीमल सोमाणी मार्ग आणि डीएन रोड येथून येणाऱ्या वाहनांची गर्दी सकाळी 9 ते 10.30 आणि संध्याकाळी 5 ते 7.30 या वेळेत सीएसएमटी परिसरात होते. यात आता 30 टक्के घट झाली आहे. यामुळे वाहतूक पोलिसांवरील ताण काहीसा कमी झाला आहे.