

मुंबई : इयत्ता दुसरी ते बारावीपर्यंत शाळेमध्ये थेट प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची यू-डायसवर नोंदणीसाठी कोणतीही प्रणाली अस्तित्वात नसल्यामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात शाळांना अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेता यू-डायसवर विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने इयत्ता दुसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी नोंदणीची लिंक उपलब्ध करून देत 17 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत.
केंद्र सरकारचे युडायस प्लस हे वेब पोर्टल आहे, त्यामध्ये प्रत्येक शाळेची माहिती दरवर्षी भरली जाते व अपडेट केली जाते. संचमान्यता ठरविण्यासाठी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांची संख्या 30 सप्टेंबरपर्यंत यू-डायसवर नोंदविण्याच्या सूचना शाळांना दिल्या आहेत.
यामध्ये अजून मुदतवाढ होण्याची शक्यता आहे, असे असले तरी शाळांमध्ये नव्याने प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची यू-डायसवर नोंदणी करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत होती. त्यानुसार इयत्ता पहिलीला प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरळीतरित्या पूर्ण करण्यात येत आहे. मात्र कधीच शाळेत न गेल्याने वयोमानानुसार थेट इयत्ता दुसरी ते बारावीला प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी यू-डायसवर कोणतीही सुविधा उपलब्ध करण्यात आली नव्हती. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शाळा प्रशासनाला या विद्यार्थ्यांच्या नोंदणी करताना अडचणी येत होत्या.
त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची यू डायसवर प्लस या पोर्टलवर तपशीलासह नोंदणी करता यावी, यासाठी अनेक शाळांनी विनंत्या सादर केल्या आहेत. अचूक आणि समावेशक डेटा संकलित व्हावा यासाठी या विद्यार्थ्यांची यू डायसवर नोंदणी होणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेऊन शाळाबाह्य ठरलेल्या या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर नोंदणी सुविधा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
त्यानुसार इयत्ता दुसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याची सुविधा 17 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध करण्यात आली आहे. या संदर्भातील मार्गदर्शक सूचना परिषदेकडून जाहीर करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या संख्येवर आधारित शिक्षक संचमान्यता निश्चित होणार असल्यामुळे प्रवेशित विद्यार्थ्यांची व ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थ्यांची 30 सप्टेंबरपर्यंत यू डायसवर नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यातच आता इयत्ता दुसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याची तरतूद करण्यात आली आहे.