

मुंबई : आम्ही जे बोलतो ते करतो, असे सांगत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ येथे गुरुवारी आपल्या पक्षाचा स्वतंत्र वचननामा प्रकाशित केला. सरकारी कर्मचार्यांना जुनी पेन्शन, प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर, शिवभोजन योजनेचा विस्तार, राज्यात 18 हजार महिला पोलिस भरती, महिलांसाठी स्वतंत्र पोलिस ठाणी, भूमिपुत्रांना नोकर्या आदी आश्वासने त्यांनी या वचननाम्यात दिली आहेत.
यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, अॅड. अनिल परब उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, एक-दोन दिवसांतच महाविकास आघाडीचा जाहीरनामा येणार आहे. तो शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि सर्व मित्रपक्ष यांचा एकत्रित जाहीरनामा असेल. त्यामुळे आम्ही काही वेगळे करण्याचा, स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याचा यात कसलाही प्रकार नाही.