

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुमचं भविष्य तुम्हाला शिवशाही मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हातात द्यायचं आहे की, गुंडांच्या ताब्यात द्यायचं, ते तुम्ही ठरवायचं आहे. कोल्हापुरातील राधानगरीत माझ्या सभेला प्रचंड गर्दी दिसून आली. लोक स्टेजला खेटून लोक बसले होते. सगळीकडे मशाल पेटताना दिसत आहे. मुंबईपासून संपूर्ण किनारपट्टीपर्यंतच नाही, तर मला राज्यात सगळीकडे मशाल धगधगलेली दिसायला पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांना केले. तसेच खोकेबाजीचं राजकारण आपल्याला आताच जाळून भस्म करायला करायला हवं, असा टोलाही शिंदेंचे नाव न घेता लगावला. रत्नागिरीतील आज उद्धव ठाकरेंची सभा पार पडली, यावेळी ते बोलत होते.
कोरोनासारख्या संकटात महाविकास आघाडी सरकारनेच महाराष्ट्राला सहीसलामत बाहेर काढलं आहे. आमच्यावरती ठाकरे म्हणून घराणेशाहीचा आरोप तुम्ही केलात मला मान्य आहे. कारण मी ती परंपरा घेऊन पुढे चाललो आहे. ती परंपरा घेऊन चाललो असल्याने माझ्याकडे काही नसताना ही हक्काची माणसं माझ्याबरोबर आहेत. शिवसेना, शरद पवारांचे घर फोडून तुम्ही राज्य करताय आणि आम्हाला म्हणाय यांनी काय केले नाही. मी काय केले नसते तर ही जनता माझ्या बरोबर राहिली नसती. २० तारखेला आपल्याला पवित्र कार्य करायचं आहे. गद्दारी या मातीत गाडून टाकायची आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
माझ्यावर घराणेशाहीचा आरोप केला जात आहे. आणि इकडे दोन भाऊ व दोन भाऊ व वडिल कोकण बसून खात आहेत. रत्नागिरीत दुसऱ्याला थाराच नाही. त्यामुळे तुम्हाला आता ठरवायचं आहे, तुम्ही तुमचं भविष्य कोणाच्या हातात सोपवणार आहात. तुम्हाला तुमचं भविष्य शिवशाही मानणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हातात द्यायचं आहे की, गुंडांच्या ताब्यात द्यायचं आहे, ते तुम्हीच ठरवा, असा घाणाघात उद्धव ठाकरेंनी सामंत बंधूसह राणेंवर केला