मुंबईः पुढारी वृत्तसेवा दिवाळीत रविवारी भाऊबीजनंतर राज्यात खऱ्या अर्थाने राजकिय फटाक्यांची माळ पेटणार आहे. एकमेकांविरोधातील आरोप-प्रत्यारोपाच्या टिकल्या फोडत विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा धुरळा उडणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांचा नारळ मंगळवार, ५ नोव्हेंबर रोजी फुटणार आहे. कोकणातील रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या प्रचारसभेला सुरुवात होणार असून पहिल्या टप्प्यात आठ मतदारसंघात त्यांच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत.
विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास २२ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आणि २९ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत होती. तर ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्यानंतर राज्यातील उमेदवारांच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यापार्श्वभूमिवर शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांचे नियोजन केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या तब्बेतीमुळे ते प्रचारसभांमध्ये सहभाग घेणार कि नाही, याबाबत साशंकता होती. अखेर पक्षाकडून ठाकरेंच्या दौऱ्याची आखणी करतानाच कोकणातून त्यांच्या प्रचारसभेला सुरुवात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ते आठ विधानसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत.
अशा आहेत सभा
• ५ नोव्हेंबर सायंकाळी ६ वाजता रत्नागिरी, राजापूर विधानसभा
• ६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता भिवंडी ग्रामीण विधानसभा
• ७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता दर्यापूर विधानसभा
• ७ नाव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता बडनेरा विधानसभा
• ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता - बुलढाणा विधानसभा
• ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मेहकर विधानसभा
• ८ नाव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता परतूर विधानसभा
महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांनी आपल्या प्रचार दौऱ्याची आखणी केली असली तरी महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचार सभेची सुरुवात बुधवार, ६ नोव्हेंबर पासून होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकूलात होणाऱ्या जाहिर सभेला राज्यभरातून कार्यकर्ते येणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे या सभेला मार्गदर्शन करणार आहेत.