कुडाळात महायुती-ठाकरे शिवसेनेत बाचाबाची
कुडाळ : कुडाळात अर्ज छाननी प्रक्रिया सुरू असतानाच तहसील कार्यालयाच्या गेटवर महायुती व महाविकास आघाडीमधील ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक बाचाबाची झाली. दोन्ही गटांतील पदाधिकार्यांनी पुढाकार घेत हे प्रकरण शांत केले. त्यानंतर पोलिस दाखल झाल्यानंतर दोन्ही गटाच्या सर्व पदाधिकारी -कार्यकर्त्यांना कार्यालयाबाहेर काढले. या घटनेमुळे कुडाळ तहसीलमधील वातावरण काही काळ तंग झाले होते.
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाच्या अर्ज छाननीवेळी मुंबईस्थित अपक्ष उमेदवार वैभव जयराम नाईक यांच्या अर्जात एका सूचकाची सही खोटी मारल्याचा आक्षेप घेण्यात आला. खोटी सही ज्याची मारल्याचा आक्षेप होता, त्याने ती सही आपली नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी सांगितले. या प्रतिज्ञापत्रातील अनु.क्र. 7 मधील सूचक हे निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे जाण्यासाठी आले असता महायुतीच्या एका कार्यकर्त्याने त्यांना गेटच्या आत जाण्यास विरोध करत धक्काबुक्की केली.(Maharashtra assembly poll)
यावेळी बाहेर थांबलेले उबाठा कार्यकर्ते आत आले व त्यांना घेऊन प्रांताधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या दालनात गेले. यावेळी प्रांताधिकारी कार्यालयाच्या मुख्य दरवाजातच दोन्ही गट आमने-सामने आल्याने वातावरण काही वेळ तंग झाले होते. या घटनेची माहिती मिळताच निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे आपले चेंबर सोडून खाली आल्या. यावेळी त्यांनी पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदुम व उपस्थित प्रमुख पदाधिकार्यांशी संवाद साधत शांत राहण्याचे आवाहन केले, त्यानंतर वातावरण शांत झाले.