

कल्याण, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात सत्तेसाठी काँग्रेस सोबत कधीही जाणार नाही, असे बाळासाहेब म्हणाले होते. खुर्ची साठी, मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलात. महाराष्ट्रात पहिली गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केली. दुसऱ्यांना गद्दार म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नसल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ठाकरे यांचा पर्दाफाश करायचे आम्ही ठरवले असून मुंबई महानगरपालिका घोटाळ्याचा तपास एसआयटी मार्फत करणार असल्याचेही फडणवीस म्हणाले आहे.
मोदी@9 महाजनसंपर्क अभियान अंतर्गत कल्याणच्या फडके मैदानात जाहीर सभेचे आयोजन केले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य भाजपा प्रभारी सी. टी. रवी, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आदींसह इतर अनेक मान्यवर, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या सुरवातीला शिवसेनेचा वर्धापनदिन त्यानिमित्ताने बाळासाहेबांना वंदन करत एकनाथ शिंदे यांना वर्धपान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबईत वर्धापनदिनाचाचे दोन कार्यक्रम असून एक ज्यांनी शिवसेना वाचवली त्यांचा तर दुसरा ज्यांनी शिवसेना बुडवली त्यांचा. भाजपा शिवसेनेच्या युतीला पूर्ण बहुमत दिले होते. उद्धव यांनी त्यावेळी युतीसाठी मते मागितली. मात्र, निवडणूक झाली आणि नियत फिरली, खऱ्या अर्थाने गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली. आमच्या पाठीत खंजीर खुपसला. पहिली गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.