

मुंबई : ठाकरे बंधू आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबीयांसमवेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. बाप्पांच्या निमित्ताने ३० दिवसांनी झालेल्या ठाकरें बंधूंच्या या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती, बुद्धिदेवता अशा सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाने आजपासून (दि. २७) मंगलमय पर्व सुरू झाले आहे. 'गणपती बाप्पा मोरया' च्या गजरात घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना सुरू आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी बाप्पा विराजमान झाले. यानिमित्त अनेक वर्षानंतर उद्धव ठाकरे कुटुंबासह राज ठाकरेंच्या घरी गेले. ठाकरे कुटुंबाने राज यांच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाची आरती केली आणि दर्शन घेतले.