

Uddhav Thackeray :
मुंबई : "अर्ध्या दाढीत इतकी ताकद कोणी निर्माण केली? त्यांची अर्धी दाढी राहिली आहे हे नशीब. त्यांनी जास्त बोलू नये, नाहीतर लोक त्यांची बिनपाण्याने करतील. राहिलेली अर्धी दाढीही काढतील. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, तिथे दाढीचा उपयोग का करत नाहीत? अशी खोचक प्रत्युत्तर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिले. "मी केवळ अर्ध्या दाढीवरून हात फिरवला तर आडवे झाले," अशी टीका एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात ठाणे येथे माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला मुलाखत दिली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, आणि राज्यातील फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.
ठाकरे ब्रँड लोकांनी स्वीकारलेला आहे, तो आम्ही बनवलेला नाही. ठाकरे प्रामाणिक आहेत. लोकांसाठी लढणारे, जनतेच्या व्यथा-वेदनांना निर्भीडपणे वाचा फोडणारे आहेत. म्हणून महाराष्ट्रातील जनता इतकी वर्षे आमच्या सोबत राहिली आहे. माझ्या आजोबांपासून आणि शिवसेनाप्रमुखांपासून हे नातं घट्ट आहे. आता मी काम करत आहे. आदित्य आणि आता सोबत राज आलेला आहे. ठाकरे म्हणजे सदासर्वदा संघर्ष आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही, असे ठाकरे म्हणाले.
ठाकरे म्हणजे संघर्ष हे समीकरण आहे. सर्व काही चोराल तुम्ही, पण ठाकरे हे नाव कसं चोरणार? नाव तर कोणी चोरू शकत नाही. चिन्ह किंवा आणखी काही चोरले तरी लोकांचं प्रेम कसं चोरणार? लोकांचा जो आमच्यावर विश्वास आहे तो कसा चोरणार? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आपली आहे ती एकच असल्याचे सांगितले.
शिंदेंची शिवसेना भाजपमध्ये विलीन करू शकतात का? यावर ठाकरे म्हणाले की, इतकी वर्षे होऊनही ते जनतेला माझ्यापासून तोडू शकत नाहीत. मालकांच्या पक्षात विलीन व्हायचं हा शेवटचा पर्याय त्यांच्यापुढं आहे. मी याआधी बोललो आहे की, निवडणूक आयोग कदाचित आमचं निवडणूक चिन्ह दुसऱ्याला देऊ शकतो किंवा गोठवू शकतो, पण ‘शिवसेना’ हे नाव ते दुसऱ्याला देऊ शकत नाहीत. त्यांना तो अधिकारच नाही. कारण हे नाव माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिले आहे. उद्या मी निवडणूक आयुक्ताचे नाव बदलून धोंड्या ठेवले तर चालेल का? या धोंड्याला पक्षाचे नाव बदलण्याचा अधिकार नाही. लोकशाही पद्धतीमध्ये आम्ही वेडंवाकडं वागलो असू तर गोष्ट वेगळी, पण संविधानानुसार आम्ही काही चूक केली नसेल तर ते आमचं चिन्हही काढू शकत नाहीत. मतांची टक्केवारी वगैरे जे काही असेल ते चिन्हापुरतं आहे. नाव दुसऱ्याला देऊ शकत नाहीत.
राऊत यांनी ठाकरेंना विचारले की, दाढीवाले मिंधे म्हणतात, मी फक्त अर्ध्या दाढीवरून हात फिरवला. पूर्ण दाढीवरून हात फिरवला तर काय होईल? अर्ध्या दाढीत इतकी ताकद कोणी निर्माण केली? यावर ठाकरे म्हणाले, त्यांची अर्धी दाढी राहिलीय हे नशीब. त्यांनी जास्त बोलू नये, नाहीतर लोक त्यांची बिनपाण्याने करतील. राहिलेली अर्धी दाढीही काढतील. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, तिथे दाढीचा उपयोग का करत नाहीत? असे प्रत्युत्तर त्यांनी दिले आहे.