

मुंबई: देशातील युवाशक्ती एकत्र आली तर काय होऊ शकते, हे आज देशाने बघितले. १२ वर्षांपासून देशवासीय दबावाखाली होते. झुरळांनी या हुकूमशहाला नमवले, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर व्यक्त केली.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
देशातील हुकूमशाही राजवटीविरोधात तरुण-तरुणींनी आंदोलन केले आणि त्यापुढे हुकूमशहाला झुकावे लागले. जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या तरुण-तरुणींना गृहमंत्री अमित शहा यांच्या अधिपत्याखालील दिल्ली पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली. त्यामुळे आता हे आंदोलन अमित शहा यांच्याकडे वळेल. त्यांना ही ‘जेन झी’ जाब विचारेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी २६ जुलैला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार होता. तो मोर्चा होणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला ही युवाशक्तीची ताकद जनतेला दाखवली पाहिजे. तसेच, यापुढे कॉक्रोच जनता पार्टी जी आंदोलनाची दिशा ठरवेल त्याला आमचा पाठिंबा असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पोलिसांनी केलेल्या अत्याचाराबाबत आता तरुण-तरुणींनी इन्स्टाग्रामवर गृहमंत्री अमित शहा यांना काही प्रश्न विचारले आहेत. खिळे असलेल्या लाठीने मुलांना का मारले? बळाचा वापर का केला? नागरी वेशातील पोलीस काय करत होते? असे हे प्रश्न आहेत, असे ठाकरे म्हणाले.