

मुंबई : सण-उत्सव जरी असले, तरी आजपासूनच मतदारयाद्यांची तपासणी सुरू करा. डोळ्यांत तेल घालून मतदार याद्या तपासा. घरोघरी जाऊन मतदारांना भेट द्या. गेल्या निवडणुकीत जी मतचोरी झाली, ४२ लाख मतदार वाढवले गेले, हे घुसलेले कोण आहेत, त्यांचा शोध घ्या, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.
पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शाखांचा दौरा सुरू केला आहे. रविवारी दहिसर येथे शाखा क्रमांक ४ला भेट देत त्यांनी उपस्थित शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, आजपासून प्रत्येक गटप्रमुखाने आणि प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागायचे आहे. आपल्या वॉर्डात मतचोर घुसलेत का, याची तपासणी करायची आहे.
नाहीतर निवडणुकीच्या दिवशी जे मतदार आपल्यातले नाहीत, त्यांच्या नावाने बोगस मतदान होईल. मागच्या वेळी काही ठिकाणी दुबार, तिबार मतदान झाले होते. आता गणेशोत्सव आहे, नंतर पितृपक्ष येईल. पितृपक्ष मी माझाच मानतो, कारण माझा पक्ष हा पितृपक्ष आहे. माझ्या पित्याने शिवसेनेची स्थापना केली. ज्यांना काही आगापिछा नाही, त्यांना सगळ्या चोऱ्या कराव्या लागतात, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला. दरम्यान, दसऱ्याला शिवाजी पार्कवर आपण भेटणारच आहोत. तिथे जे काही बोलायचे आहे, ते बोलणारच आहे. याआधीही मी शाखांना भेटी दिल्या होत्या, यापुढेही देत राहीन, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
गेली दोन-तीन वर्षे इकडे शिवसेनेला धक्का, तिकडे धक्का अशा बातम्या येत आहेत. असे धक्के देणारे अनेक आले आणि गेले. पण, शिवसेनेला काहीही झाले नाही. कदाचित थोडा धक्का बसला असेल, पण कधी धोका झालेला नाही. अनेकांनी धोके देण्याचे प्रयत्न केले, यापुढेही करतील. पण, जोपर्यंत शिवसैनिकांची तटबंदी मजबूत आहे, तोपर्यंत धोका आणि धक्का देणाऱ्यांची डोकी फुटतील. शिवसेना फुटणार नाही. स्वतःला वाघ म्हणवणारे अनेक काळी मांजरे वाटेत येत आहेत, त्या काळ्या अपशकुनी मांजरांचा बंदोबस्त करायला शिवसैनिक आहेतच, असा टोलाही ठाकरे यांनी शिंदे गटाला लगावला.