

मुंबई : निवडणुका संपल्या, आता आमचा कोणीही शत्रू नाही. जे असतील, ते आमचे वैचारिक विरोधक आहेत. त्यामुळे मुंबईच्या विकासाच्या अजेंड्याला जे साथ देतील, त्यांना सोबत घेऊ. जे साथ देणार नाहीत त्यांच्याशिवाय पुढे जाऊ. पण, मुंबई आता थांबणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मांडली.
भाषेच्या, जातीच्या पलिकडे, प्रत्येक समाज भाजपसोबत उभा राहिला आहे. मुंबईतील मराठी माणूस हा विकासासोबत म्हणजे भाजपसोबत आहे. मराठी माणसाला आपली जहागीर समजणाऱ्यांनाही हे लक्षात आल्याचा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.
मुंबई पालिका निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप उमेदवारांचा शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंबई भाजपच्या दादर येथील कार्यालयात नवनिर्वाचित नगरसेवकांना संबोधित करताना ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, काहीजण सांगू लागले आहेत, गेल्यावेळी तुमच्या 82 जागा आल्या होत्या, त्यात आला केवळ 7 जागांची वाढ झाली, तुम्ही असे कोणते मोठे यश मिळवले. पण, त्यांना सांगायचे आहे, गेल्यावेळी आम्ही 227 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 82 जिंकलो होतो. पण, यंदा 135 लढवून 89 जिंकलो आहोत. एकट्या भाजपला मुंबईत 45 टक्के मतदान झाले. उबाठाचा विचार करता, भाजपपेक्षा 30 अधिक जागा लढवूनही ते 27 टक्क्यांवर आहेत. गेल्या तीन निवडणुकांत जो सगळ्यात मोठा पक्ष होता, त्याला 89 जागा कधीच मिळाल्या नव्हत्या. भाजपने कमी जागा लढवून देखील, ते साध्य केले.