

Two arrested with 56 kg of ganja in Juhu
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
जुहू परिसरात गांजा घेऊन आलेल्या दोघांना वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. सोमेश भिकुलाल मुंगसे ऊर्फ मॅडी आणि बाळू दगडूबा खिल्लारे ऊर्फ बालाजी अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी 56 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा आणि एक बलेनो कार असा 19 लाख 55 हजार 625 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांनी सांगितले. अटकेनंतर या दोघांनाही स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
जुहू परिसरात काहीजण गांजा घेऊन येणार असल्याची माहिती युनिट नऊच्या अधिकार्यांना मिळाली. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने जुहू येथील एन. ए. आहुजा रोड, पी. ए. म्हात्रे क्रिडा मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर साध्या वेशात पाळत ठेवली.
रात्री उशिरा तिथे बलेना कारमधून दोन्ही आरोपी आले. या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्यांना सुमारे चौदा लाखांचा 56 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. या गांजासह साडेपाच लाखांची कार असा मुद्देमाल ताब्यात घेतल्यानंतर दोघांनाही पुढील चौकशीसाठी युनिट कार्यालयात आणण्यात आले.
सोमेश ऊर्फ मॅडी हा डान्सर असून तो छत्रपती संभाजीनगरचा आहे. त्याच्याविरुद्ध छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणासह लैंगिक अत्याचार व पोक्सो, तर तेलंगणाच्या उत्पादन शुल्क पोलीस ठाण्यात 28 किलो गांजा तस्करीच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद आहे. बाळू ऊर्फ बालाजी हा लातूरच्या भोकरदनचा रहिवाशी असून मजुरीचे काम करतो.