

मुंबई : समृद्धी महामार्गाचा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) आणखी एक प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे (यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग) दहापदरीकरण करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. या प्रकल्पासाठी 14 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
या सहापदरी महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी त्याचे आठपदरीकरण करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला होता. त्याबाबतचा प्रस्तावही राज्य शासनाला पाठवला होता. आता थेट दहापदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या 10 दिवसांत शासनाला पाठवला जाणार आहे. त्यानंतर हा प्रकल्प कधी सुरू होणार आणि त्याच्या पूर्णत्वाची कालमर्यादा काय असेल, याबाबत सविस्तर माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे.
मुंबई-पुणे प्रवास वेगवान करण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची बांधणी करण्यात आली. 2002 साली हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे मुंबई ते पुणे हे अंतर आता केवळ अडीच तासांत पार करता येते. गेल्या काही वर्षांत या महामार्गावरून प्रवास करणार्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे महामार्ग अपुरा पडू लागला आहे. दहा पदरीकरण झाल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकेल. सध्या या महामार्गावरून 65 हजार ते 1 लाख वाहने धावतात.
मार्ग विस्तार : सध्याच्या सहापदरी मार्गाचे दहापदरीकरण होणार.
वाहतूक कोंडीतून सुटका : विशेषतः घाट परिसर आणि इतर गर्दीच्या ठिकाणी होणार्या वाहतूक कोंडीवर मात करण्यास मदत होईल.
प्रवासाचा वेळ वाचणार : मार्ग विस्तारामुळे वाहनांना अधिक वेगवान आणि विनाअडथळा प्रवास करता येईल, प्रवासाचा वेळ कमी होईल.
सुरक्षितता वाढणार : आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित पायाभूत सुविधांमुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
औद्योगिक विकासाला चालना : पुणे व मुंबई ही दोन्ही शहरे औद्योगिकद़ृष्ट्या महत्त्वाची असून या प्रकल्पामुळे मालवाहतूक अधिक सुलभ होईल व विकासाला गती मिळेल.
वाढत्या गरजांची पूर्तता : भविष्यातील वाढणार्या वाहनांच्या संख्येचा विचार करून हा विस्तार करण्यात येत आहे.