पुढारी ऑनलाईन डेस्क
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज गुरुवारी (दि. २७) सुरू झाले. आज विधीमंडळ अधिवेशनाच्या सुरुवातीला करवीरचे आमदार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत पी. एन. पाटील सडोलीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पी. एन. पाटील यांचे २३ मे रोजी निधन झाले होते. विधानसभेत शोक प्रस्ताव मांडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले, माजी राज्यमंत्री तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या जेष्ठ नेत्या मिनाक्षी पाटील, गंगाधर गाडे, त्र्यंबकराव कांबळे, हिंगोलीचे माजी आमदार दगडूजी गलंडे, गोन्साल्वीस, विश्वास गांगुर्डे यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.
गुरुवारी २७ जूनपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप १२ जुलैला होईल. तीन आठवडे चालणारे हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणी करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवन पायऱ्यांवर घोषणाबाजी केली.
दरम्यान, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचे चहापानाचे निमंत्रण विरोधकांनी नाकारले. यामुळे विरोधकांनी सरकारविरोधात अधिवेशन सुरू होण्याआधीच शड्डू ठोकला. पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या पायर्यांवर विरोधकांची आक्रमक भूमिका पाहायला मिळाली.