

मुंबई : ऑक्टोबर महिन्यात किराणा मालाच्या व्यापाऱ्याच्या घरी झालेल्या 18 लाख 60 हजार रुपयांच्या चोरीप्रकरणी सांताक्रुज पोलिसांनी दोघांना अटक केली. रविंद्र नारायण निरकर आणि निकिता धनजी हाथियानी अशी या दोघांची नावे असून यातील निकिता ही तक्रारदार व्यापाऱ्याची मुलगी तर रविंद्र हा तिचा प्रियकर आहे.
लग्नासाठी पैशांची गरज असल्योन निकितानेच रविंद्रच्या मदतीने ही चोरी घडवून आणल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या दोघांनाही स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील तक्रारदार सांताक्रुज येथे राहत असून तिथेच त्यांच्या मालकीचे एक किराणा मालाचे दुकान आहे. त्यांना दुकानाच्या उत्पनातून सहा लाख रुपये मिळाले होते, तसेच त्यांनी त्यांची गुजरात येथील एक वडिलोपार्जित जमिनीची विक्री केली होती. त्यातून त्यांना सहा लाख रुपये मिळाले होते. बारा लाखांची ही कॅश आणि सोन्याचे दागिने त्यांनी एका धातूच्या डब्ब्यात बेडरुममध्ये ठेवले होते. 18 नोव्हेंबरला त्यांची पत्नी आणि मुलगी या दोघीही मार्केटमध्ये गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या घरात कोणीही नसल्याची संधी साधून एका अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला होता. या चोरट्याने कॅश आणि दागिने असलेला धातूचा डब्बाच पळवून नेला होता. हा प्रकार नंतर त्यांच्या पत्नीच्या लक्षात येताच तिने पतीला ही माहिती दिली. त्यानंतर त्यांनी सांताक्रुज पोलिसांत चोरीची तक्रार केली होती.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तांत्रिक माहितीवरुन तक्रारदार व्यापाऱ्याची मुलगी निकिता व तिचा प्रियकर रविंद्र या दोघांना ताब्यात घेतले होते. या दोघांनी चोरीची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली.