

मुंबई : कांदिवलीतील एका वयोवृद्ध महिलेच्या घरी चोरी करून पळालेल्या नोकराला काही तासांत कांदिवली पोलिसांनी अटक केली. राकेश जयानंद महतो असे या नोकरीचे नाव असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार आहे.
68 वर्षांची तक्रारदार महिला इलाबेन मनूभाई मेहता ही तिच्या मुलासोबत कांदिवलीतील महावीरनगर, आयकोन हाईट इमारतीत राहते. पाच वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले होते. तिचा मुलगा रियल इस्टेटचे काम करतो. गेल्या सात महिन्यांपासून त्यांच्याकडे राकेश हा घरगडी म्हणून काम करत होता. सकाळी काम करून तो अर्ध्या किंवा एक तासानंतर निघून जात असे.
बुधवारी तिच्या मुलाने ड्रॉव्हरमधील सोन्याची पाहणी केली असता त्यात दागिने होते, त्यानंतर तो कामावर निघून गेला. काही वेळानंतर राकेश हा त्यांच्या घरी कामासाठी आला. मात्र काम न करता तो काही वेळात घरातून वृध्देला काहीच न सांगता निघून गेला. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने ड्रॉव्हरमधील सोन्याच्या दागिन्यांची पाहणी केली असता तिला सुमारे पाच लाखांचे सोन्याचे विविध दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. तिने राकेशला कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने तिला प्रतिसाद दिला नाही. नंतर त्याने मोबाईलच बंद केला. त्यामुळे तिने कांदिवली पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. त्यानंतर पोलिसांनी तिच्या घरी जाऊन पाहणी करून तिच्या तक्रारीवरुन राकेश महतो याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. ही शोधमोहीम सुरू असताना गुरुवारी पळालेल्या राकेशला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.