

Tiger Shroff Shooting: १८ ऑक्टोबर रोजी मुंबईत फुटबॉल सामना खेळून बाहेर येत असताना टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाला होता. याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्विकारली आहे. मात्र टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याने अख्खे बॉलीवूड हादरून गेलं आहे. खुद्द टायगरला देखील मोठा धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे.
टायगर श्रॉफ याच्या कारवर गोळीबार झाल्यापासून अजूनपर्यंत टायगरने जबाब नोंदवलेला नाही. लवकरच पोलिसांकडून याबाबत अधिकृत जबाब नोंदवला जाणार आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर पोलिस टायगर श्रॉफ यांच्याशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी, “गोळीबाराच्या घटनेमुळे मी प्रचंड धक्क्यात आहे. माझ्या गाडीवर अशा प्रकारे हल्ला होईल, याचा मी कधी विचारही केला नव्हता,” अशी प्रतिक्रिया दिली होती.
तसेच, “माझे कोणाशीही वैर नाही. गोळीबार करणारे लोक कोण होते, त्यांनी गोळीबार का केला आणि हा हल्ला कोणी घडवून आणला, याबाबत मला काहीही माहिती नाही,” असेही टायगर श्रॉफ यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते.
दरम्यान, या घटनेनंतर टायगर श्रॉफ यांना मोठा धक्का बसल्याने गुन्हे शाखेकडून अद्याप त्यांचा अधिकृत जबाब नोंदवण्यात आलेला नाही. लवकरच टायगर श्रॉफ यांचा जबाब नोंदवण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
मुंबई क्राईम ब्रँचच्या पथकाने तपासादरम्यान २३ ऑक्टोबर २०२६ रोजी गुजरातमधील सुरत येथून दोन फायर आर्म्स आणि १० जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
याप्रकरणी मुंबईतील डीसीबी सीआयडी पोलीस ठाण्यात १९ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा क्रमांक १४३/२०२६ नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम १०९(१), ३(५) तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३ आणि २५ अंतर्गत हा गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई क्राईम ब्रँचकडून सुरू आहे.