

मुंबई : रविवारी सायंकाळी ७ वाजता जुहूच्या फुटबॉल मैदानाजवळ टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडल्यानंतर तिथून पिवळ्या दुचाकीवर निसटलेले तिघे हल्लेखोर एसव्ही रोडमार्गे विले-पार्ले आणि अंधेरीत पोहोचले. तिथे त्यांनी अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी टाकून दिली. स्थानकात धडपडत दाखल होत त्यांनी बोरिवलीची लोकल पकडली.
इथपर्यंतचा माग सीसीटीव्हीने दाखवताच मुंबई पोलिसांनी आरोपी शेजारील राज्यात जाऊ शकतात, असा कयास लावला आणि निरनिराळी पथके निरनिराळ्या दिशांना रवाना केली. मात्र, दिल्लीचा अंदाज खरा ठरला. हे हल्लेखोर दिल्लीहून राजस्थान मार्गे बिहार गाठणार होते आणि नेपाळला निसटण्याचा त्यांचा बेत होता.
मुंबई पोलिसांनी आपली कीर्ती सार्थ ठरवत हे आरोपी कुठल्या दिशेने गेले असावेत हे अचूक ओळखले. अंधेरी पश्चिम रेल्वे स्थानकाच्या बाहेर सापडलेल्या पिवळ्या दुचाकीचा मालक कोण हे लक्षात येताच तिघेही हल्लेखोर कोणत्या राज्यात जाऊ शकतात याचा अंदाज आला. ही दुचाकी हृत्विकने गेल्या सप्टेंबरमध्येच खरेदी केली होती.
मोटरसायकल टाकून दिल्यानंतर हल्लेखोरांनी बोरिवलीला जाणारी लोकल पकडली. तेथून त्यांनी एक ॲप आधारित कॅब भाड्याने घेत सूरत गाठले. ही कॅब हल्लेखोरांपैकी एक असलेल्या हृत्विक कुर्मी उर्फ रोशनने बुक केली होती. कॅब बुकिंगमधून त्याचे तपशील मिळाले.
सुरतला पोहोचताच तिघांनीही राजस्थानला जाणारी पुणे-जयपूर एक्स्प्रेस पकडली. या गाडीच्या कोणत्या डब्यात ते बसलेले आहेत इथपर्यंतची माहिती मुंबई पोलिसांनी मिळवली आणि त्यांनी तत्काळ राजस्थानच्या कोटा पोलिसांना सतर्क केले.
मुंबई पोलिसांनी एक संकेत दिला आणि राजस्थान पोलिसांच्या ॲन्टी गँगस्टर पथकाने कोटा रेल्वे स्थानकाला अक्षरश: घेरले व तिघा हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या.