

ठाणे : शुभम साळुंके
सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या तावली पर्वतावर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेलेले मुंबईतील चार तरुण घनदाट जंगलात वाट चुकले. अंधार आणि अनोळखी परिसर यामुळे घाबरलेल्या या तरुणांनी मदतीसाठी पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर हिललाईन पोलिसांनी मोबाईल टॉर्चच्या उजेडात पाच तासांची थरारक शोधमोहीम राबवून या चौघांची सुखरूप सुटका केली. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल भाजप आमदार चित्रा वाघ यांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.
मुंबईच्या दादर परिसरात राहणारे चार तरुण मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगड भागातील तावली पर्वतावर भटकंतीसाठी आले होते. सकाळी पर्वतावर गेल्यानंतर घनदाट जंगल आणि निसरड्या वाटांमुळे ते रस्ता चुकले. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी तात्काळ ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून मदतीची याचना केली.
पोलिसांनी तात्काळ प्रतिसाद देत स्थानिक हिललाईन पोलिसांना माहिती दिली. मात्र, याच दरम्यान पर्यटकांचा मोबाईल फोन दरीत पडल्याने त्यांच्याशी संपर्क तुटला, ज्यामुळे शोधकार्यात मोठा अडथळा निर्माण झाला.
हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले.
कारवाईत सहभागी पथक:
पोलीस उपनिरीक्षक अंकुश सुरेवाड
पोलीस हवालदार संदीप मुसळे
पोलीस नाईक प्रशांत पाटील
या पथकाने अपुऱ्या साधनसामग्रीसह, केवळ मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात पाच तासांहून अधिक काळ घनदाट जंगलात शोधमोहीम राबवली. अखेर मंगळवारी सायंकाळी या चौघाही तरुणांना शोधण्यात पोलिसांना यश आले. त्यांना सुखरूप खाली आणून त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
पोलिसांच्या या धाडसी आणि यशस्वी कामगिरीची माहिती मिळताच भाजप आमदार चित्रा वाघ यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून संपूर्ण पथकाचे कौतुक केले. तसेच, या जिगरबाज पोलिसांचे अभिनंदन करण्यासाठी त्या बुधवारी हिललाईन पोलीस ठाण्याला भेट देणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
तावली पर्वताचा परिसर हा बिबट्या आणि इतर जंगली प्राण्यांच्या वास्तव्यासाठी ओळखला जातो. स्थानिक नागरिक पर्यटकांना वेळोवेळी सतर्कतेच्या सूचना देत असतात. मात्र, काही अतिउत्साही पर्यटक या सूचनांकडे दुर्लक्ष करून स्वतःचा जीव धोक्यात घालत असल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आले आहे.