मुंबई : गोमातेच्या हत्येवर बंदी असणारे कायदे धाब्यावर बसवून जेएनपीटी बंदरातून तब्बल ५७ हजार किलो गोमांस परदेशात पाठवले जात असल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे.
तेलंगणातील कत्तलखान्यात गाईला कापून अवयवांची तस्करी करणाऱ्या दोन कंटेनर्सची माहिती गोसेवा आयोगाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. मनीष वर्मा हे गोसेवा आयोगाचे सदस्य आहेत. गोवंशाची सेवा करणे हे त्यांचे ब्रीद आहे. देशभरातून या संदर्भात येणाऱ्या तक्रारींवर ते लक्ष ठेवून असतात. आंध्रप्रदेशात होणाऱ्या गोहत्या कमी झाल्या असल्या तरी तेलंगणा मात्र मोठ्या प्रमाणात कत्तलखाने आहेत. तेथून तस्करी करणारी वाहने हैद्राबादहून नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टकडे नवी मुंबईला पोहोचतात अशी चर्चा असे.
यावेळी दोन कंटेनरमधून अवैध मांस जेऐनपीटीकडे निघाली होती. ही माहिती मिळताच कायद्यातील तरतुदीचा वापर करुन ही दोन्ही वाहने लोणावळ्याला थांबवली गेली. पोलिस स्थानकाकडे ही वाहने वळवण्यात आली. गोसेवा कायद्यातील तरतुदींनुसार वाहनातील माल तपासण्याची मागणी करण्यात आली. वाहकांनी म्हशीचे मांस पाठवले जाते आहे असे सांगत दोन आईसबॉक्स तपासणीसाठी देण्याची तयारी दाखवली. मात्र गोसेवा कायद्यातील तरतुदींच्या आधारे रँडम सैंपलिंगसाठी कंटेनरमधील सामान ताब्यात घेतले गेले.
मासाची तपासणी पुणे येथील गृहखात्याच्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेत करण्यात आली. तेंव्हा हे मास म्हशीचे नसून गाईचे असल्याचे आढळून आले. ही धक्कादायक माहिती झालेल्या गो सेवा आयोगाच्या सदस्यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी आणि विशेष कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर वझे यांच्यामार्फत देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली त्यानंतर लगेच गोमांसबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करुन मासांची तस्करी थोपवण्यात आली. या एका प्रकरणाची माहिती तर मिळाली पण अशा पध्दतीने तस्करी होते कशी याची खोलात जावून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.
गस्त वाढवा असे आदेशही देण्यात आले आहेत. दिल्लीतील अपेडाचे अधिकारी यासंदर्भात सक्रीय झाले आहेत. अवैधरित्या परदेशात जाणारे गोवंशाचे मांस हा चिंतेचा विषय ठरला असतानाच गोमातेचे अवयव मोठ्या प्रमाणात कापले जात असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले. आता तपासयंत्रणांनी या विषयात गती वाढवत या तस्करीवर रोख आणण्यास प्रारंभ केला आहे.