Coastal Road Accident| कोस्टल रोडवर बीएमडब्ल्यूचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

मुंबईत कोस्टल रोडवर भीषण अपघात; गाडीचा चेंदामेंदा
Coastal Road Accident |
Coastal Road Accident | उड्डाणपुलावरून कार कोसळून तिघांचा मृत्यू-
Published on: 
Updated on: 

मुंबई: मुंबईच्या कोस्टल रोडवर रविवारी पहाटे भरधाव बीएमडब्ल्यू कार पुलाच्या कठड्यावरून उडाली आणि थेट ७५ फूट खाली कोसळून झालेल्या भीषण अपघातात तीन विद्यार्थी जागीच ठार झाले, तर चौथा विद्यार्थी गंभीर जखमी आहे.

धैर्य दर्शन शेठ (१७), आदित्य जकासनिया (१९) आणि शनय गज्जाल (२१) अशी ठार झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. आदित्य कल्पेश्वर ओसवाल (२३) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चौघेही अहमदाबादचे असून, जुहूला पेईंग गेस्ट हाऊसमध्ये राहून ते शिकत होेते. शनय गज्जाल आणि आदित्य जकासनीया हे दाेघे जुहूतीलच व्‍यवस्थापन महाविद्यालयात शिकत होते. धैर्य शेठ हा कुर्ल्यातील कॉलेजमध्ये शिकत होता.

सीसीटीव्‍ही फुटेजमध्ये हा भयंकर अपघात टिपला गेला. त्यावरील वेळ पहाटे ५.२० ची आहे. मरीन ड्राइव्हकडून हाजी अलीच्या दिशेने जाणारी ही काळ्या रंगाची बीएमडब्ल्यू (क्र. डीडी ०१ सी ६३०२) लाला लाजपतराय कॉलेजसमोरील लोटस जेट्टीजवळ कोस्टल रोडच्या उत्तर दिशेच्या मार्गावर पुलाच्या कठड्यावरून उडाली.

खाली पार्किंगचे काम सुरू असलेल्या ठिकाणी कोसळली. अतिवेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचा संशय आहे. अपघाताची नेमकी कारणे मात्र तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत. घटनास्थळी ताडदेव पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि पथक दाखल झाले. वाहनाचा वेग, चालकाचे नियंत्रण कसे सुटले आणि अपघातापूर्वी वाहनाची हालचाल याबाबत तपास सुरू आहे.

या विद्यार्थ्यांनी मद्य प्राशन करून गाडी चालवली का, असा संशय व्‍यक्त झाला. मात्र, त्यास कोणतीही पुष्टी मिळालेली नाही. प्रचंड वेग हेच या अपघाताचे प्राथमिक कारण मानले जाते. त्यामुळे कोस्टल रोड आणि प्रचंड वेगाने होणारे अपघात हे समीकरण पुन्हा एकदा या अपघाताने पुढे आणले आहे.

Coastal Road Accident |
Mumbai Coastal Road: कोस्टल रोडवरील वेगाला लगाम कधी? वेगमर्यादेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कोस्टल रोडवर वेगमर्यादा असली तरी ती अमलात कशी आणायची हा प्रश्न वाहतूक प्रशासनाला अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे अनेकदा इथे चारचाकी गाड्यांच्या जीवघेण्या स्पर्धाही होतात आणि बळी जातात. रविवारच्या अपघातात अशी स्पर्धा नव्‍हती. मात्र, विद्यार्थ्यांनी बीएमडब्ल्यूच्या वेगाशीच जणू स्पर्धा लावली आणि जीव गमावला.

वेगाचे बळी

वाहन भरधाव वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कार पुलाच्या कठड्यावरून खाली कोसळली. अपघातामागील नेमके कारण तपासातून स्पष्ट होईल, अशी माहिती ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीना जगताप यांनी दिली.

अहमदाबादचे हे चार विद्यार्थी जुहूमध्ये पेईंग गेस्ट हाऊसमध्ये राहून मुंबईत शिकत होेते. त्यातील शनय गज्जाल या बड्या बापाच्या विद्यार्थ्याकडे स्वत:ची काळ्या रंगाची बीएमडब्ल्यू (डीडी-०१-सी-६३०२) होती.

शनिवारी मध्यरात्री चौघेही याच बीएमडब्ल्यूने मरीन ड्राईव्‍हला फिरायला गेले. पहाटे परत जुहूकडे जाण्यासाठी मरीन ड्राईव्‍हवरून ते हाजी अलीच्या दिशेने निघाले.

गाडी स्वत: शनय गज्जाल चालवत होता. पहाटेची वेळ आणि सुनसान रस्ता यामुळे वेगाची नशा चढली. लाला लाजपतराय कॉलेजसमोरील लोटस जेट्टीजवळ असलेल्या वळणावर शनयचे गाडीवरील नियंत्रण सुटले. प्रचंड वेग आणि त्यात वळणाचा अंदाज त्याला आला नसावा.

लोटस जेट्टीजवळ पुलाच्या कठड्यावरून ही गाडी उडाली आणि थेट ७५ फूट खाली कोसळली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार कठड्यावर उडी घेत खाली जाताना आणि हवेत काही वेळा उलटीपालटी होताना दिसते. या फुटेजमध्ये टिपली गेलेली वेळ पहाटे ५.२० ची आहे.

पुलावरील नरीमन पॉईंटच्या नावाचा फलकही कारच्या धडकेत थोडा तुटला आहे. याचा अर्थ कठड्याचे नुकसान न करता या गाडीने सरळ उड्डाण घेतलेले दिसते.

कोस्टल रोडच्या पुलाखाली पार्किंगचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ही कार कोसळली आणि कारचा चेंदामेंदा झाला. धैर्य, आदित्य आणि शनय तिघेही जागीच ठार झाले. चौथा आदित्य ओसवाल गंभीर जखमी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news