

Maharashtra Hindi Third Default Language Issue
मुंबई : शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र स्वीकारत यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून तिसरी भाषा लागू केली. मात्र, या तिसर्या भाषेचे समायोजन याआधीच तयार झालेल्या वेळापत्रकात करताना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शिक्षण आनंददायी करण्यात मोलाचा वाटा असलेल्या तीन विषयांच्या वेळेलाच कात्री लावली आहे.
पहिली आणि दुसरीच्या आधीच्या वेळापत्रकानुसार कला आणि हस्तकला या विषयासाठी आठवड्यातील चार तासिका राखून ठेवल्या होत्या. प्रत्येक तासिका 60 मिनिटांची म्हणजेच एक तासाची होती. त्यामुळे आठवड्यातून चार तास विद्यार्थ्यांच्या चित्रकला, हस्तकला आदी गुणांना वाव मिळून त्यांचा बौद्धिक आणि मानसिक विकास होणे शक्य होते. त्याशिवाय क्रीडा आणि आरोग्य विषयासोबतच कार्यशिक्षणासाठी (बागकाम) प्रत्येकी 45 मिनिटांच्या दोन तासिका आठवड्याच्या वेळापत्रकात नियोजित केल्या होत्या.
एससीईआरटीने गुरुवारी जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकात नेमक्या या तीन विषयांच्या वेळेलाच कात्री लावली आहे. या वेळापत्रकात या तीनही विषयांच्या तासिकांची संख्या तेवढीच म्हणजे चार किंवा दोन एवढीच ठेवण्यात आली आहे. मात्र तासिकेसाठी उपलब्ध कालावधीत घट करण्यात आली आहे. यात कला-हस्तकला विषयासाठी आता 60 ऐवजी फक्त 35 मिनिटे म्हणजेच सुमारे निम्मा वेळ देण्यात येणार आहे. तर क्रीडा व कार्यानुभव या विषयांच्या तासिका 45 ऐवजी 35 मिनिटांच्या होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या खेळाच्या वेळेतूनही शालेय शिक्षण विभागाने 10 मिनिटे प्रति तासिका कमी केली आहेत.
एका विषयाला महत्त्व देताना इतर विषयांचे महत्त्व कमी करण्याचा हा प्रकार आहे. मुलांचा ताण कमी करणार्या विषयांचा वेळ कमी करणे हे नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात किंवा राज्य अभ्यासक्रम आराखड्यातही अपेक्षित नाही. क्रीडा आणि कला तासिकांची वेळ कमी करणे हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.
जयवंत कुलकर्णी, समुपदेशक