नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सिडको आंतरराष्ट्रीय शैक्षणिक शहर वसवणार रसरात त्यासाठी पाच विदेशी विद्यापीठांना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते शनिवारी हॉटेल ताजमध्ये एका कार्यक्रमात इरादापत्रे देण्यात येणार आहेत.
मुंबई रायजिंग-क्रिएटिंग इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी या राज्य सरकारच्या उपक्रमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात पाच परदेशी विद्यापीठांना त्यांच्या कॅम्पसची स्थापना करता येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित राहणार आहेत.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. सिडकोमार्फत उभारल्या जाणाऱ्या या आंतरराष्ट्रीय एज्युसिटीमुळे देशातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाची संधी मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ५ किलोमीटर परिसरात नामांकित १० परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्याचे नियोजन आहे.
ही देशातील पहिली अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी ठरणार आहे. हा प्रकल्प नवी मुंबई व मुंबईला जागतिक शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख मिळवून देईल आणि महाराष्ट्र राज्याचे एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट व भारताचे पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे आर्थिक लक्ष्य २०२९ पर्यंत साध्य करण्यासाठी एक महत्त्वाचा घटक ठरेल.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ५ किलोमीटर परिसरात सिडकोचे १० परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्याचे नियोजन आहे. या परदेशी विद्यापीठांमध्ये अॅबर्डीन विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन या विद्यापीठांचा समावेश आहे.