आव्हाडांकडून झालेली चूक गंभीरच, पण…किरण मानेंची पोस्ट चर्चेत

Maharashtra Politics 
Maharashtra Politics 

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी महाड येथे मनुस्मती दहन आंदोलनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडले. यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात राज्यभर आंदोलने सुरू आहेत. दरम्यान, अभिनेते किरण माने यांची आव्हाड यांच्या संबधित पोस्ट चर्चेत आहे. Maharashtra Politics

काय म्हणाले किरण माने

  • अनावधानाने जितेंद्र आव्हाड यांच्याकडून झालेली चूक गंभीरच..
  • आव्हाडांनी आंदोलन करताना काळजी घ्यायला हवी होती
  • आव्हाडांनी माफी मागीतली इथं विषय संपला

किरण माने : तो व्हिडीओ पहावतही नव्हता…

जितेंद्र आव्हाडांकडून अनवधानानं जी चूक झाली ती गंभीरच होती. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'मनूस्मृती' जाळल्याची आठवण पुन्हा ताजी व्हावी हा हेतू स्तुत्य होता. पण अशा आंदोलनात जे करायचे आहे त्याची योग्य ती खबरदारी न घेतल्याचा रागही आला. खुप वाईटही वाटले. तो व्हिडीओ पहावतही नव्हता . पण या निमित्तानं सतत अर्वाच्य शब्दांत ट्रोलींग करणार्‍या भक्ताड पिलावळीला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी जो पुळका आलेला आहे. तो पाहून आता जाम हसू यायला लागलंय!

आव्हाडांनी माफी मागीतली इथं विषय संपला खरंतर. पण त्यानंतरही यांचा जो थयथयाट सुरू आहे तो फार विनोदी आहे. खरंतर या पिलावळीला कुणी सिरीयसली घेत नाही. त्यांच्या निषेधाला महत्त्व तेव्हा मिळालं असतं जेव्हा एका धोतरवाल्या बेडकानं महात्मा फुले-सावित्रीबाईंची उघड उघड टवाळी केली होती तेव्हाही ते इतकेच पेटून उठले असते. त्यांच्या निषेधाला महत्त्व तेव्हा मिळालं असतं, जेव्हा एका किळसवाण्या झुरळानं महात्मा गांधींच्या मातेच्या चारित्र्याचे हनन केले होते तेव्हा त्यांची संतापानं लाहीलाही झाली असती. त्यांच्या निषेधाला महत्त्व तेव्हा मिळालं असतं, जेव्हा एका दाढीवाल्या बोकडानं माता जिजाऊबद्दल वाईटसाईट लिहीलं होतं तेव्हा त्याचे थोबाड फोडले असते. जितेंद्र आव्हाड यांच्या निमित्ताने शिवशाहूफुलेआंबेडकरांची सतत बदनामी करणार्‍या पिलावळीला आता झालेली उपरती आणि त्यांचा उच्छाद आमचे मनोरंजन करत आहे हे नक्की.
– किरण माने.

काय आहे प्रकरण?

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होत असल्याचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाचा निषेध करत महाड येथे चवदार तळ्याजवळ आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी आव्हाडांकडून मनुस्मृती ग्रंथाचे दहन करण्यात आले. याबरोबरच जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टरही फाडण्यात आले होते. विरोधकांनी आंदोलने करीत आव्हाडांच्या अटकेची मागणी केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्याकडून माफी

दरम्यान, अनावधानाने माझ्याकडून माझ्या बाबाचा फोटो नकळत फाडला गेला, ही अत्यंत गंभीर चूक असल्याचे सांगत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तमाम नागरिकांची नतमस्तक होऊन माफी मागितली आहे. तसेच आंबेडकरी अनुयायीही मला माफ करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. या घटनेनंतर त्यांच्या घराभोवती पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news