

पुढारी ऑनलाईन डेस्क: मान्सून परतीचा कालावधी १९ सप्टेंबरपासून सुरू होत असल्याची अपडेट हवामान विभागाने दिली होती. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा मान्सून परतीचा प्रवास लाबल्याचे देखील हवामान विभागाने म्हटले होते. मान्सून परतीच्या पाश्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यातील बहुतांशी भागासह लगतच्या भागात येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून आज (दि.२२ सप्टेंबर) स्पष्ट करण्यात आले आहे. पुणे हवामान विभागाचे तज्ज्ञ डॉ. के. एस. होसाळीकर यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.
डॉ. होसाळीकर यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, पश्चिम मध्य बंगालची खाडी आणि त्याच्या लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांशी भागांत पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या ४ ते ५ दिवसांत महाराष्ट्र व लगतच्या भागात पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच मराठवाडा, महाराष्ट्राचा घाट भाग आणि कोकणातील काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडणार असल्याचे देखील हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी पिक कापणीवेळी हवामानचा अंदाज घेण्याचा सल्ला देखील हवामान विभागाने दिला आहे.
सोमवार 23 सप्टेंबरला कोकणातील काही भागात मध्यम व तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान राज्यात देखील काही प्रमात पाऊस असणार आहे, असेही हवामान विभागाने दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे.