

मुंबई : ‘हा सरकारचा शहाणपणा नाही, ही त्यांची हार आहे. मराठीत फूट पाडण्याचा आणि आमच्या भाषेवर हिंदी लादण्याचा महायुती सरकारचा छुपा अजेंडा आम्ही उधळून लावला आहे. आम्ही एकत्र येणार, याचा धसका बसल्यानेच त्यांनी घाबरून माघार घेतली,’ अशा घणाघाती शब्दांत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल करत त्रिभाषा सूत्राचा जीआर रद्द झाल्याचे श्रेय मराठी एकजुटीला दिले आहे.
सरकारने माघार घेतली असली तरी हा लढा थांबलेला नाही, असा इशारा देत आता 5 जुलै रोजी होणारा नियोजित मोर्चा रद्द करून, त्याच दिवशी त्याच ठिकाणी भव्य ‘विजयी सभे’ची घोषणा करण्यात आली आहे. ‘आम्ही एकत्र आलो आहोत आणि एकत्रच पुढे जाणार,’ असा निर्धार व्यक्त करत या सभेतून सरकारच्या मनमानीला सडेतोड उत्तर दिले जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ‘हा जीआर ठाकरे सरकारच्या काळातील समितीचा आहे,’ या केलेल्या आरोपाची अक्षरशः खिल्ली उडवण्यात आली. ‘जर मी मुख्यमंत्री असताना हा जीआर काढला होता, तर हे तीन वर्षे झोपले होते का? भाजप ही अफवांची फॅक्ट्री आहे. आपल्या चुका लपवण्यासाठी आणि मूळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी खोटेनाटे आरोप करणे, हीच यांची ओळख आहे,’ असे सडेतोड उत्तर देत फडणवीसांचा दावा खोडून काढण्यात आला.
विरोधकांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत म्हटले आहे की, ‘ही सरकारची सद्बुद्धी नाही, तर मराठी माणसाच्या ताकदीची भीती आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याप्रमाणे एक मोठी चळवळ उभी राहील, ५ तारखेच्या मोर्चात आपली एकजूट दिसेल, या भीतीनेच सरकारने जीआर रद्द करण्याचा निर्णय घेतला. मराठी माणसात फूट पाडण्याचा त्यांचा डाव होता, पण तो आम्ही यशस्वी होऊ दिला नाही.’
उद्धव ठाकरे म्हणाले, आता हा लढा नव्या टप्प्यावर पोहोचला आहे. ५ जुलै रोजी होणारी ‘विजयी सभा’ ही केवळ विजयोत्सव नसेल, तर सरकारला एक खणखणीत इशारा असेल. सभेचे नेमके स्वरूप आणि वेळ येत्या दोन दिवसांत ठरवून जाहीर केली जाईल. आम्ही एकत्र आलो आहोत आणि भविष्यातही एकत्रच राहणार, हा संदेश या सभेतून दिला जाईल. हा विजय तमाम मराठी जनतेचा असल्याने, सर्वांनी या विजयी सभेत सहभागी होऊन आपली ताकद दाखवावी. आता समिती कोणाचीही नेमा, पण महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करण्याचा कोणताही प्रयत्न यापुढे खपवून घेतला जाणार नाही,’ असा अंतिम इशाराही सरकारला देण्यात आला.