मुंबई; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान सोमवारी होत आहे. महामुंबईतील नऊ जागांसह 13 मतदारसंघांत होणार्या मतदानातून दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद होणार आहे.
या टप्प्यात मुंबईतील सहा जागा, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या मतदार संघात विद्यमान केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ज्ञ उज्ज्वल निकम, ठाकरे गटाचे खा. अरविंद सावंत असे दिग्गज नशीब आजमावत आहेत. मुंबईतील सर्वच सहाही जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मतदार मतदान केंद्रावर येईल, यासाठी कार्यकर्ते आणि समर्थक प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.
राजधानी मुंबईतील सर्व जागा जिंकण्याचा चंग बांधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी पायाला भिंगरी बांधून प्रचार केला. त्याचवेळी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदींनी रॅली, सभा आणि मेळावे घेतले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या ठाण्यात त्यांचे समर्थक
नरेश म्हस्के, कल्याणमधून त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे शिंदे यांनी या दोन्ही मतदारसंघांत मोर्चेबांधणी केली आहे.
शिवाय नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्यासाठीही त्यांनी सभा आणि रोड शो केला. याशिवाय महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांच्या सभाही झाल्या. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा झाल्या. दुसरीकडे मविआनेही मुंबई आणि ठाण्याचा परिसर पिंजून काढला. शुक्रवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, शरद पवार, उद्धव ठाकरे यांची संयुक्त जाहीर सभा झाली. दोन्हींकडून शनिवारीही रॅली, सभा आणि मेळाव्याने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. आता उद्या प्रत्यक्ष मतदान होत आहे.
मुंबई उत्तरमध्ये पीयूष गोयल (भाजप) यांच्या विरोधात भूषण पाटील (काँग्रेस), मुंबई उत्तर पश्चिममध्ये अमोल कीर्तीकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) वि. रवींद्र वायकर (शिवसेना एकनाथ शिंदे), मुंबई उत्तर पूर्वमध्ये मिहिर कोटेचा (भाजप) वि. संजय दिना पाटील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), मुंबई उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम (भाजप) वि. वर्षा गायकवाड (काँग्रेस), मुंबई दक्षिणमध्ये अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे) वि. यामिनी जाधव (शिवसेना शिंदे), मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे (शिवसेना शिंदे) वि. अनिल देसाई (शिवसेना ठाकरे) यांच्यात लढत होत आहे.
नाशिकमध्ये हेमंत गोडसे (शिवसेना शिंदे) यांच्या विरोधात ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे, धुळ्यात काँग्रेसच्या शोभा बच्छाव विरोधात भाजपचे सुभाष भामरे, दिंडोरीत विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार (भाजप) यांच्याविरोधात शरद पवार गटाचे भास्कर भगरे, पालघरला भाजपचे हेमंत सावरा विरुद्ध ठाकरे गटाच्या भारती कामडी, ठाण्यात ठाकरे गटाचेच राजन विचारे विरुद्ध शिंदे गटाचे नरेश म्हस्के, कल्याणला मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि विद्यमान खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर; तर भिवंडीमध्ये भाजपचे कपिल पाटील यांच्याविरोधात शरद पवार गटाचे सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे अशी लढत होत आहे.