भररस्त्यात हल्ला करून प्रेयसीची निर्घृण हत्या

भररस्त्यात हल्ला करून प्रेयसीची निर्घृण हत्या

नालासोपारा, पुढारी वृत्तसेवा : प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने मानसिक संतुलन बिघडलेल्या रोहित यादव (29) नावाच्या माथेफिरूने आरती यादव (22) या तरुणीचा भररस्त्यात अत्यंत निर्दयपणे खून केला. डोक्यात जाडजूड पान्याचे घाव बसताच आरती जागीच कोसळली तरी तो घाव घालतच राहिला. मंगळवारी सकाळी वसईच्या चिंचपाडा येथे थरकाप उडवणारी ही भयंकर हत्या येणारे-जाणारे फक्त बघत राहिले.

दिवसाढवळ्या भररस्त्यात घडलेल्या या हत्येने महाराष्ट्र हादरून गेला. विरोधी पक्षांसह राज्यभरातून राज्याच्या गृहखात्यावर ताशेरे ओढले जात आहेत.

वसई नालासोपारा येथे राहणारा रोहित यादव आणि आरती यादव यांचे सहा वर्षार्ंपासून प्रेम होते. मात्र रोहित नियमित काम करत नव्हता. त्यामुळे आरतीच्या नातेवाईकांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता, त्यातून रोहितची मानसिक अवस्था बिघडल्याचे सांगण्यात येतेे. अशात आरती दुसर्‍या मुलाशी बोलत असल्याचा रोहितला संशय होता. त्याच्या मनात हा रागही धुमसत होता. त्यातून दोघांत वाद वाढीत गेले.

मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आरती वसईतील एका कंपनीत कामावर जात असताना रोहितने तिला स्टेट बँकेसमोर अडवले. तू दुसर्‍या मुलाबरोबर का बोलतेस, असे विचारत तो तिच्याशी वाद घालू लागला. काही क्षणातच बेफाम होत त्याने हातातील जाड लोखंडी पान्याने आरतीवर वार केले. वर्मी घाव बसल्याने ती रस्त्यावर कोसळली. त्या अवस्थेतही रोहितने तिच्यावर वार करणे सुरूच ठेवले. 'तूने मेरे साथ एैसा क्यूं किया' असे हा माथेफिरू निपचित पडलेल्या आरतीला विचारत होता आणि पान्याचे घाव घालत होता. आरती जागीच मृत्युमुखी पडली. त्यानंतर रोहित तिच्या मृतदेहाजवळ कितीतरी वेळ बसून होता. तेथेच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

आरतीचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. एक महिन्यापूर्वी ती नोकरीलाही लागली होती. पुढील आयुष्याची स्वप्ने पाहणार्‍या आरतीची मंगळवारची सकाळ मात्र मृत्यू घेऊन आली. रोहित तिच्यावर हल्ला करत असताना जमावाने या माथेफिरूला अडवले असते तर तिचे प्राण वाचले असते. पण सारे नुसते बघत राहिले. कुणी या हत्येचा व्हिडीओ करण्यात गुंतले, कुणी सुरक्षित अंतरावर उभे राहून त्याला काही सांगून पाहिले. एका तरुणाने मध्ये पडून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण तो निष्फळ ठरला.

हल्ला करणारा रोहित यादव हा मूळचा हरियाणाचा आहे. तो गॅरेजमध्ये काम करत असे. आरती यादवचे कुटुंबीयही उत्तर प्रदेशचे आहे. तिचे वडील पानटपरीचा व्यवसाय करायचे. रोहित नियमित काम करत नव्हता. त्यामुळे आरतीच्या नातेवाईकांचा या लग्नाला विरोध असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र रोहित तिच्याशीच लग्न करणार असल्याचे सांगत तिचा पाठलाग करत असे. मंगळवारचा हा पाठलाग आरतीच्या जीवावर उठला.

गृहविभागाचे अपयश : पटोले

या घटनेनंतर महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भर रस्त्यात मुलीची हत्या होणे हे गृहविभागाचे अपयश असल्याचे म्हटले आहे; तर विधानसभेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी तरुण पिढीचे मानसिक स्वास्थ्य बदलत चालले आहे. त्यातून अशा घटना घडत असल्याचे म्हटले आहे.

पोलिसांनी दुर्लक्ष केले

आरती यादवच्या कुटुंबाने रोहित विरोधात तक्रार करूनही पोलिसांनी ती गांभिर्याने घेतली नाही. आणि या माथेफिरूला लगामही घातला नाही. त्यातून आरतीची हत्या झाली, असा गंभीर आरोप आरतीच्या कुटुंबीयांनी केला आहे. आरतीची आई निर्मल यादव यांनी सांगितले की, रोहित आणि आरती या दोघांचे नेहमी फोनवर बोलणे व्हायचे. रोहितने लग्न करण्यासाठी तिच्या मागे तगादा लावला होता. आम्ही त्याला आधी घर घे म्हणत होतो. पण नंतर त्याने मला घर घेणे शक्य नसल्याचे सांगत आरतीमागे लग्नाचा तगादा सुरू ठेवला. काही दिवसांपूर्वी रोहितने आरतीचा मोबाईल फोडला होता. मी पोलिसात तक्रारही दाखल केली होती. पण पोलिसांनी आमचे ऐकले नाही.

आरतीने चार दिवसांनंतर पोलिसांना फोन केला आणि माझा मोबाईल कधी मिळणार असे विचारले. त्यावर पोलिसांनी तिला 'काय हजार पाचशे रुपयांसाठी तू फोन करतेस', असे आरतीलाच सुनावले. रोहितने मोबाईल तोडल्यानंतर नंतरही पोलिसांनी त्याच्याविरोधात काहीच कारवाई केली नाही. पोलिसांनी कारवाई केली असती तर आज ही घटना घडली नसती. माझ्या मुलीचा जीव गेला. आता त्याचाही जीव पाहिजे. माझी मुलगी नाही तर तो देखील नकोय, असे म्हणत आरतीच्या आईने अक्षशः हंबरडा फोडला.

आरतीच्या वडिलांनी सांगितले की, रोहित आमच्या शेजारी राहत होता. माझ्या मुलीवर तो प्रेम करत नव्हता तर आमच्या मुलीला तो त्रास देत होता. आम्ही 10 दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यामध्ये रोहितविरोधात तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी दोघांनाही समजावून घरी पाठवले. त्यानंतर आज ही घटना घडली. पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळेच आरतीची हत्या झाली. आरतीची बहिण म्हणाली, परवाच्या रविवारीही वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात आम्ही गेलो होतो. पोलिसांनी त्याला एक दोन दंडे मारून सोडून दिले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news