

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
ठाण्यातील तीन हात नाका परिसरात ३ हजार मिलीमीटर व्यासाच्या मुंबई-३ जलवाहिनीमधून होणारी गळती बंद करण्याचे काम शुक्रवार रात्रीपासून सुरू आहे. परंतु तांत्रिक कारणांमुळे या दुरुस्ती कार्यवाहीत अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे स्वातंत्र्य दिनादिवशी शहर व पूर्व उपनगरात पाणीबाणी उद्भवली आहे.
ठाण्यातील तीन हात नाका परिसरात पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या ३ हजार मिलीमीटर व्यासाच्या मुंबई-३ जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती आढळून आली होती. ही जलवाहिनी जमिनीखाली असून तिच्यावर आवरण करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे ही जलवाहिनी सुमारे ३ ते ४ मीटर खोलीवर असल्याने गळती दुरुस्तीचे काम तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आहे. गळतीची माहिती मिळताच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन पातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
जलवाहिनीपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून गळतीचा स्रोत शोधणे आणि जलवाहिनीची दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.तांत्रिक कारणांमुळे या दुरुस्ती कार्यवाहीत अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे जलवाहिनीवरील गळती थांबवण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत.
या कामामुळे मुंबईतील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून शहर व पूर्व उपनगरातील अनेक भागात शनिवारी पाणीच आले नाही. तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. त्यामुळे मुंबईकरांची भल्या पहाटे चांगलीच धावपळ उडाली. दरम्यान नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
शहर : कुलाबा, नरिमन पॉईंट, फोर्ट, गिरगाव, ग्रँटरोड, ताडदेव, मुंबई सेंट्रल, भायखळा, परेल, माझगाव, शिवडी, वडाळा, दादर, धारावी, सायन व अँटॉप हिल.
पूर्व उपनगर : चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, शिवाजीनगर, कुर्ला, घाटकोपर, पवई, विक्रोळी, कांजूर गाव, भांडुप.