मुंबई : पुढारी वृत्तसेवा,
महाविकास आघाडीच्या जागावाटप चर्चेला गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर ७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार असतानाच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने दबावतंत्राचा भाग म्हणून मुंबईतील २२ जागांवर आपले संभाव्य उमेदवार निश्चित केल्याचे वृत्त आहे. (Maharashtra Politics)
महाविकास आघाडीत सध्या ज्याचा आमदार ती त्याची जागा असे एक धोरण आधीच जाहीर झाले आहे. अर्थात काही जागांची अदलाबदली होऊ शकते. ती गृहित धरली तरी उद्धव यांनी मुंबईतल्या २५ ते ३० जागांची मागणी केली आहे. त्यापैकी २२ उमेदवार आधीच ठरवताना काही नव्या मतदारसंघांवरही दावा केलेला दिसतो.
ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईतील २२ जागांवरील उमेदवारही निश्चित करून मित्रपक्षांना धक्का दिल्याचे म्हटले जात आहे. यात संभाव्य उमेदवारांत २०१९ मध्ये जिंकलेल्या आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली असून जे पक्ष सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले व भाजपाने जिंकलेल्या १६ जागांपैकी काही जागांचाही यात समावेश आहे. संभाव्य उमेदवारांमध्ये विलास पोतनीस, उदेश पाटेकर (मागाठाणे), विनोद घोसाळकर (दहिसर), सुनील प्रभू (दिंडोशी), अमोल कीर्तिकर, बाळा नर, शैलेश परब (जोगेश्वरी पूर्व), ऋतुजा लटके (अंधेरी पूर्व), राजू पेडणेकर, राजुल पटेल (वर्सोवा), वरुण सरदेसाई (वांद्रे पूर्व), विशाखा राऊत, महेश सावंत (माहिम), अजय चौधरी, सुधीर साळवी (शिवडी), आदित्य ठाकरे (वरळी), किशोरी पेडणेकर, रमाकांत रहाटे (भायखळा), ईश्वर तायडे (चांदिवली), अनिल पाटणकर, प्रकाश फातर्पेकर (चेंबूर), रमेश कोरगावकर (भांडुप), सुनील राऊत (विक्रोळी), संजय पोतनीस (कलिना), विठ्ठल लोकरे, प्रमोद शिंदे (अणुशक्तीनगर), सुरेश पाटील (घाटकोपर), प्रविणा मोरजकर (कुर्ला), नीरव बारोट (चारकोप), समीर देसाई (गोरेगाव), श्रद्धा जाधव (वडाळा) यांचा समावेश असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
मुंबईतील विधानसभेच्या काही जागांची अदलाबदल करण्याचे काँग्रेस-शिवसेना ठाकरे गटाने ठरविले असून, यात चांदिवली हा २०१९ च्या निवडणुकीत सेनेने जिंकलेला मतदारसंघ काँग्रेसला देण्यात येणार आहे. त्या बदल्यात वांद्रे पूर्व मतदारसंघ ठाकरे गटाला देण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे.