

विरोधकांकडून सातत्याने तोच जुना राग आळवला जात आहे
त्यांना स्वतःची माणसं सांभाळता आली नाहीत
वैयक्तिक स्वार्थासाठी आणि राजकीय अस्तित्वासाठी जातीय समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न
Chandrashekhar Bawankule on Thackeray Alliance
मुंबई : "ज्यांचे राजकीय अस्तित्व पूर्णपणे लयास गेले आहे, तेच आता राजकारणात तग धरण्यासाठी युतीचा आधार घेत आहेत," अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीच्या अधिकृत घोषणेवर भाजपचे नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली.
शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आज युतीची अधिकृत घोषणा केली. पत्रकार परिषदेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांसह भाजपवर निशाणा साधत मुंबईचा माणूस मराठी माणूसच होणार असा विश्वास व्यक्त केला. युतीच्या अधिकृत घोषणेवर माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, "मुंबई तोडण्याचे राजकारण याआधीही अनेकदा झाले आहे. विरोधकांकडून सातत्याने तोच जुना राग आळवला जात आहे, परंतु आता जनतेला सर्व काही कळून चुकले आहे. 'मुंबई तोडणार' ही त्यांची कॅसेट आता जुनी झाली असून, जनता आता अशा अफवांना बळी पडणार नाही."
महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या फिरतायत, त्यात दोन व्यक्ती समाविष्ट आहेत. हे लोक राजकीय पक्षांमधील मुलं (नेते/कार्यकर्ते) पळवत आहेत," असा टोला ठाकरे बंधुंनी संयुक्त पत्रकार परिषदेत लगावला होता. या टीकेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, "त्यांना स्वतःची माणसं सांभाळता आली नाहीत, म्हणूनच त्यांचे खंदे समर्थक आणि लोक त्यांना सोडून गेले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधीही जात किंवा धर्माचे राजकारण केले नाही. त्यांनी नेहमीच विकासाला प्राधान्य दिले आहे. याउलट, विरोधक मात्र केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी आणि राजकीय अस्तित्वासाठी जातीय समीकरणे जुळवण्यात व्यस्त आहेत. एकेकाळी हिंदुत्वाचा अभिमान बाळगणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर आज केवळ धर्माचे राजकारण करण्याची वेळ आली आहे, असा गंभीर आरोपही बावनकुळे यांनी यावेळी केला.