

नवी मुंबई : मैत्रिणीच्या आईने अपमान करीत चापट मारली म्हणून एका पंधरा वर्षीय मुलीने जीवन संपवल्याची घटना ऐरोलीत घडली आहे. याप्रकरणी संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी दुपारी साडे तीन ते रात्री साडे आठच्या दरम्यान घडली.
ऐरोलीतील तडवळी येथे राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीचा तिच्या मैत्रिणीसोबत वर्गात वाद झाला होता. त्यामुळे मैत्रिणीच्या आईने तिला घरी बोलावून अपमान केला. यावेळी तिने विद्यार्थिनीला पाठीत एक चापट मारली. यावेळी तिच्या अन्य मैत्रिणीलाही संशयित आरोपी महिलेने मारहाण केली. हा अपमान सहन न झाल्याने पीडित मुलीने घरी येऊन गळफास घेत जीवन संपवले.
यावेळी तिचे आई-वडील नोकरी निमित्त बाहेर गेले होते. तर भाऊ शाळेत गेला होता. पालक घरी आल्यावर जीवन संपवल्याचे निदर्शनास आले. गुरुवारी अपरात्री दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
रेश्मा गवांदे आणि तिची शेजारीण मयुरी नाईकवडी यांना अटक केली आहे, अशी माहिती तपासाधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील यांनी दिली .
सॉरी मम्मी पप्पा माझ्यामुळे दिवाळी...
जीवन संपवण्यापूर्वी मयत विद्यार्थिनीने एक पत्र लिहले होते. त्यानुसार तिने घडलेली घटना नमूद केली आहे. या शिवाय आई वडिलांची अनेकदा माफी मागत तुमच्यावर खूप प्रेम करते, असेही लिहले आहे. याशिवाय माझ्यामुळे दिवाळी वाईट गेली, असेही पत्रात लिहले आहे. या पत्रात अनेक ठिकाणी इंग्रजीचा वापर केला असून पूर्ण पत्र इंग्रजी मुळाक्षरे वापरून मराठीत लिहले आहे. असेही सूत्रांनी सांगितले.