

मुंबई: मुंबई शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तानसा तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. या तलावात आता अवघा ०.७७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे या तलावातून होणारा पाणीपुरवठा एक-दोन दिवसात बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांची तहान पाच तलावांतून भागवावी लागणार आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम १ लाख दशलक्ष लिटर्स पाणी शिल्लक राहिले आहे. दिवसेंदिवस तलावांतील पाण्याची घट होत असताना पाणलोट क्षेत्रात पावसाचा मात्र अद्यापपर्यंत पत्ताच नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची चिंता वाढली आहे.
जुलै महिन्यात पाऊस पडेल, या आशेवर कपातीत वाढ न करता पाणी पुरवठा सुरू आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी सध्याच्या पाणी कपातीमध्ये कोणतीही वाढ न करता १५ ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल, असे सांगितले होते. पण सध्याचा पाणीसाठा लक्षात घेता, जेमतेम महिनाभर पुरेल इतके पाणी आहे.
शहराला अप्पर वैतरणा, भातसा, मध्य वैतरणा, तानसा मोडक सागर या पाच तलावांतून सर्वाधिक पाणीपुरवठा होतो. यापैकी अप्पर वैतरणा तलाव पंधरा दिवसांपूर्वीच आटला आहे. तर आता तानसा तलावही आटला आहे.
भातसा तलावातही आता अवघा ४४ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यास पाणी कपातीत वाढ करणे भाग पडेल. परिणामी मुंबईकरांवर भीषण पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
२७ जून तलावांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
अप्पर वैतरणा ० (० टक्के)
मोडक सागर २४,३२३ (१८.८७ टक्के)
तानसा १,११३ (०.७७ टक्के)
मध्य वैतरणा २१,८९० (११.३१ टक्के)
भातसा ४४,२१६ (६.१७ टक्के)
विहार १२,४९९ (४५.१३ टक्के)
तुळशी १,७१५ (२१.३१ टक्के)